“दोनवेळा मतमोजणी,२ मतांचा थरार! धाकट्या जाऊबाईंचा थोरल्या जाऊबाईवर विजय”
“दोनवेळा मतमोजणी,२ मतांचा थरार! धाकट्या जाऊबाईंचा थोरल्या जाऊबाईवर विजय”
लातूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकाल अत्यंत थरारक ठरला असून अवघ्या दोन मतांच्या फरकाने विजय-पराभव निश्चित झाला. या लढतीत धाकट्या जाऊबाई आशा भिसे यांनी त्यांच्या थोरल्या जाऊबाई सरिता भिसे यांचा पराभव करत विजय संपादन केला.
मिळालेल्या माहितीनुसार, या गटात सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. निकाल अत्यंत जवळचा असल्याने मतमोजणीची प्रक्रिया दोनवेळा तपासण्यात आली. अखेरीस अधिकृत निकालात काँग्रेसच्या आशा भिसे यांना आघाडी मिळाली आणि त्यांनी अवघ्या 2 मतांच्या फरकाने विजय निश्चित केला.
ही लढत विशेष ठरण्याचे कारण म्हणजे काँग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे यांच्या दोन्ही बंधूंच्या पत्नी या एकमेकींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होत्या. परिणामी, हा सामना केवळ राजकीय न राहता कौटुंबिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी काँग्रेसला यश मिळत असल्याचे चित्र दिसत असून, कामखेडा गटातील हा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे. या निकालामुळे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.
अधिकृत निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला, तर पराभूत गटाकडून निकालाचा शांततेत स्वीकार करण्यात आला. कामखेडा गटातील हा थरारक निकाल सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.



