महाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

कुंभमेळा निधीमुळे निर्णयात बदल? राजकीय दबावाची चर्चा

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

कुंभमेळा निधीमुळे निर्णयात बदल? राजकीय दबावाची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) :- भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ३१ जानेवारी रोजी ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन’ विभागात करण्यात आलेली त्यांची बदली अचानक रद्द करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

२००५ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या मुंढे यांची आतापर्यंत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. ताज्या निर्णयानुसार त्यांना नव्या पदावर रुजू होण्यापासून रोखण्यात आले असून, सध्या ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हा निर्णय का घेण्यात आला, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

दरम्यान, या घडामोडीमागे नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा संदर्भातील मोठ्या निधीच्या नियोजनाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी येणार असल्याने विविध विकासकामे आणि आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहेत. अशा परिस्थितीत नियमांचे काटेकोर पालन करणारे आणि ‘मिस्टर क्लीन’ म्हणून ओळखले जाणारे मुंढे यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप काही वर्तुळांतून केला जात आहे.

या फेरबदलामध्ये विनीता वैद सिंगल यांच्याकडेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंढे यांच्याबाबतचा निर्णय अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे, वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असलेल्या मुंढे यांच्यावर आधीच कुटुंबीय दु:खाचा प्रसंग ओढावलेला असताना, या अचानक झालेल्या प्रशासकीय निर्णयामुळे त्यांची स्थिती ‘विनापद’ अशी निर्माण झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनात पारदर्शकता, राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!