*गुन्हे शाखेच्या तडाख्यात सहा आरोपींचा पर्दाफाश — १२५ सीसीटीव्ही फुटेजने उघडला संपूर्ण कट*
दमाणी नगरात बसून रचला होता दरोड्याचा कट; पिस्तुल, कोयता, गाड्या आणि मोबाईल जप्त — अजिंक्य चव्हाणच्या रंगबदल गाडीचा धक्कादायक खुलासा
सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):-
आरटीओ रोडवरील प्रसिद्ध “समर्थ ज्वेलर्स” या दुकानावर झालेल्या दरोड्याच्या प्रयत्नाने सोलापूरकर हादरले होते. परंतु काही दिवसांतच सोलापूर शहर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा थरारक पर्दाफाश करत सहा सदस्यीय दरोडेखोर टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.
या टोळीत साहिल दशरथ गायकवाड (२०, रा. भैरू वस्ती, सोलापूर), समर्थ समीर गायकवाड, सार्थक दशरथ गायकवाड, अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळवाडी, पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर, जि. धाराशिव), अनिकेत पांडुरंग गायकवाड (रा. सोलापूर) आणि एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे.
या सर्वांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद केले.
१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता तीन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून समर्थ ज्वेलर्स दुकानासमोर आल्या.
त्यातील दोनजण आत घुसून पिस्तुल आणि कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.
दुकानातील मालक दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांच्या आरडाओरडीनंतर आरोपी मोटारसायकलवर बसून पसार झाले.
घटनेनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.
तपासादरम्यान उघड झाले की सर्व आरोपींनी दमाणी नगरातील मैदानात बसून दरोड्याचा कट रचला होता.
अजिंक्य चव्हाणने स्वतःचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे आणली, तर साहिल गायकवाडने कोयता तयार ठेवला होता.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अजिंक्यने आपली पांढरी अॅक्टीव्हा निळ्या रंगाने रंगवली आणि टोळी दोन गाड्यांवरून आरटीओ रोडवर आली.
याच क्षणी त्यांनी समर्थ ज्वेलर्समध्ये प्रवेश करून लुटीचा प्रयत्न केला.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ७ पथके तयार केली.
शहरातील तब्बल १२५ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी यतीमखाना परिसरातील मैदानात प्लेटिना (MH-13 EA-2578) गाडीसह थांबले आहेत.
तातडीने सापळा रचून पोलिसांनी आरोपींना पकडले आणि चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी कोयता, पिस्तुल, दोन मोटारसायकली, मोबाईल फोन, आणि पांढरी-निळी अॅक्टीव्हा जप्त केली.
तपासादरम्यान उघड झाले की आरोपी समर्थ गायकवाड व अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वीही होटगी रोडवरील चौधरी फिलिंग सेंटरवर ३९ हजार रुपयांच्या दरोड्यात सहभाग घेतला होता.
*पोलीस आयुक्तांचा इशारा:*
या घटनेबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले –
> “गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपींना पकडले आहे. सोलापूरमध्ये अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.”
या यशस्वी कारवाईनंतर व्यापारी व नागरिकांनी सोलापूर पोलिसांचे कौतुक केले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले की तांत्रिक तपास आणि तत्पर पोलिस कारवाईमुळे गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या विळख्यातून सुटू शकत नाहीत.








