क्राईम

गाडी जप्त न करण्याच्या बदल्यात लाचेचा व्यवहार; पोलीस स्टेशनचे ASI एसीबीच्या जाळ्यात

गाडी जप्त न करण्याच्या बदल्यात लाचेचा व्यवहार; पोलीस स्टेशनचे ASI एसीबीच्या जाळ्यात

पुणे (प्रतिनिधी):- कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस दलावरच लाचखोरीचा डाग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पौड पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) सचिन बाळासाहेब शिंदे (वय 45) यांना गाडी जप्त न करण्यासाठी व तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.40 वाजता पौड पोलीस ठाणे अंतर्गत मुळशी बीट कार्यालय येथे पार पडली.

तक्रारदाराविरुद्ध पौड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल असून त्याचा तपास एएसआय सचिन शिंदे करत होते. या प्रकरणात संबंधिताची गाडी जप्त न करण्यासाठी तसेच तपासात सहकार्य करण्याच्या बदल्यात आरोपी अधिकाऱ्याने सुरुवातीला रु. 1,00,000/- (एक लाख) लाचेची मागणी केल्याची तक्रार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विभागाने तत्काळ पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान एक लाख रुपयांच्या मागणीवरून तडजोड करत रु. 35,000/- (पस्तीस हजार) स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.

पडताळणी निष्पन्न झाल्यानंतर ACB पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे मुळशी बीट कार्यालयात पंचासमक्ष तक्रारदाराकडून 35 हजार रुपये स्वीकारताना एएसआय शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. कारवाईनंतर आरोपी अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरोपी लोकसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7 अन्वये पौड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई ACB पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील तसेच अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*नागरिकांना आवाहन*

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त इतर कोणतीही रक्कम मागत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दूरध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप तसेच ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच लाच स्वीकारल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे प्रशासनात स्वच्छतेचा संदेश गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!