सोलापूर

“वडिलांच्या निधनाचं दु:ख…तरीही दहावीचा पेपर; धनश्रीच्या धैर्याला शिक्षणाधिकाऱ्यांचा सलाम!”

“वडिलांच्या निधनाचं दु:ख…तरीही दहावीचा पेपर; धनश्रीच्या धैर्याला शिक्षणाधिकाऱ्यांचा सलाम!”

सोलापूर (प्रतिनिधी):- दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही शिक्षणाच्या स्वप्नाला प्राधान्य देणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिला साथ देणाऱ्या शिक्षक-प्रशासनाची हृदयस्पर्शी घटना सोलापूरमध्ये घडली. शरदचंद्र पवार प्रशालेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी धनश्री भिकाजी पवार हिच्या वडिलांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच दिवशी तिचा मराठी विषयाचा पहिला पेपर होता.

घरात शोककळा पसरलेली, नातेवाईक आणि शेजारी अंत्यविधीसाठी जमा होत असताना धनश्रीचा पहिला पेपर बुडणार अशी भीती निर्माण झाली होती. तिच्या वडिलांनी पाहिलेले शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी पुढाकार घेतला.

मुख्याध्यापक माने यांनी स्वतः धनश्रीच्या घरी जाऊन तिच्या आई, भावाला व नातेवाईकांना समजावून सांगितले. अंत्यविधीची वेळ सुमारे दोन तास पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी केली. परिस्थितीची जाणीव ठेवून कुटुंबीयांनीही सहकार्य केले. धनश्रीला धीर देत तिला परीक्षेसाठी तयार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी परीक्षा केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांच्याशी संपर्क साधून विशेष परिस्थिती लक्षात घेऊन धनश्रीला आवश्यक ती मुभा देण्याबाबत सूचना केल्या. एवढेच नव्हे तर ते स्वतः परीक्षा केंद्रावर जाऊन धनश्रीची भेट घेतली व तिला मानसिक आधार दिला.

धनश्रीला पूर्ण तीन तास परीक्षा देणे शक्य नसल्याने तिने सुमारे दीड तास पेपर लिहिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तिला संतोष लोंढे यांच्या वाहनाने पुन्हा अंत्यविधीसाठी घरी आणले.

वडिलांच्या निधनाच्या दु:खातही शिक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या धनश्रीच्या धैर्याने उपस्थित नातेवाईक, शिक्षक, शेजारी आणि संस्थाचालक सर्वांचे डोळे पाणावले. एका बाजूला कुटुंबीयांचे दु:ख, तर दुसऱ्या बाजूला मुलीचे शैक्षणिक स्वप्न—या द्वंद्वात शिक्षण व्यवस्थेने दाखवलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

या प्रसंगातून शिक्षण विभागाने मानवी दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर प्रशासनाने दाखवलेली साथ आणि शिक्षकांचा पुढाकार हा समाजासाठी आदर्श ठरावा, अशी भावना व्यक्त होत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!