क्राईम

पीएफ’ची फाईल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; एसीबीच्या जाळ्यात तीन अधिकारी अडकले!

‘पीएफ’ची फाईल मंजूर करण्यासाठी मागितली लाच; एसीबीच्या जाळ्यात तीन अधिकारी अडकले!

सोलापूर : भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधून ५ लाख रुपये काढण्यासाठी अर्ज केलेल्या एका सहशिक्षकाकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील दोन अधिकारी आणि एका ग्रंथपालाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. सापळा रचून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सहशिक्षक असून त्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ५ लाख रुपये काढण्यासाठी वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर कार्यालयात अर्ज केला होता. मात्र ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर १५ जून रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड यांनी १ हजार रुपये, वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी यांनी ४ हजार रुपये आणि ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले यांनी १ हजार रुपये अशी एकूण ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीने १८ जून रोजी सापळा रचला. या कारवाईदरम्यान ग्रंथपाल विक्रम बारबोले यांनी तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. पडताळणी आणि सापळा कारवाईच्या आधारे अधीक्षक बालवाड, वरिष्ठ लिपिक मेटकरी आणि ग्रंथपाल बारबोले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते तसेच एसीबी सोलापूरच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!