योगातून निरोगी शरीर, एकाग्र मन आणि उज्ज्वल भविष्य घडते – मल्लिकार्जुन मसुती
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

योगातून निरोगी शरीर, एकाग्र मन आणि उज्ज्वल भविष्य घडते – मल्लिकार्जुन मसुती
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अक्कलकोट : योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी जीवनशैलीचा पाया आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित योग व ध्यानधारणा अंगीकारणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आयोजित योग शिबिरात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मसुती पुढे म्हणाले की, भारताला योगविद्येची समृद्ध परंपरा लाभली असून प्राचीन काळापासून योगाचा अभ्यास आणि प्रसार होत आला आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताण, धावपळ आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग आणि प्राणायाम हे निरोगी जीवनाचे प्रभावी साधन ठरू शकते.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी दररोज योगाभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी योगशिक्षक चंद्रकांत बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. योगाचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास सेमी विभागाचे दिगंबर जगताप, पर्यवेक्षक सिद्रामप्पा पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश आवटे तसेच राजकुमार गवळी, रवीकिरण दंतकाळे, पूजा कडबगावकर, मल्लिनाथ जमखंडी, मनीषा दूधभाते आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना स्वामी यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशिगंधा कोळी यांनी केले.



