एनटीपीसीचा सुवर्ण महोत्सव उत्साहात — सोलापूर प्रकल्पात ५१वा स्थापना दिवस भव्यदिव्य सोहळ्यात साजरा

सोलापूर (प्रबुध्द राज न्युज):-राष्ट्रीय ताप विद्युत निगम लिमिटेड (एनटीपीसी) चा ५१वा स्थापना दिवस आणि सुवर्ण महोत्सव सोलापूर प्रकल्पात अत्यंत दिमाखात, उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. संस्थेच्या पाच दशकांच्या यशस्वी प्रवासाचा आणि ऊर्जाक्षेत्रातील मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमाद्वारे ऊर्जा उत्पादनासोबत हरित विकासाची भावना अधोरेखित करण्यात आली. त्यानंतर प्रकल्पप्रमुख श्री बी. जे. सी. शास्त्री यांनी एनटीपीसीचा ध्वज फडकावून संस्थेच्या गौरवशाली प्रवासाला मानवंदना दिली.
यावेळी ‘पॉवर एक्सेल’ आणि ‘एम्प्लॉयी ऑफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार एनटीपीसी कर्मचाऱ्यांच्या समर्पण, नवोन्मेषी कार्य आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले गेले. विजेत्या कर्मचाऱ्यांचा गौरव संपूर्ण प्रकल्पाच्या उपस्थितीत झाला.
या सोहळ्यात श्री एम. के. बेबी (मुख्य महाव्यवस्थापक – प्रचालन व अनुरक्षण), श्री सुभाष एस. गोखले (महाव्यवस्थापक – अनुरक्षण व प्रशासन), सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाने आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनामुळे राज्यातील ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीचा संकल्प पुन्हा दृढ केला.
एनटीपीसी सोलापूरचा स्थापना दिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर जबाबदारी, नव्या उर्जेचा संकल्प आणि देशाच्या प्रगतीत अधिक वाटा उचलण्याचे प्रेरणास्थान ठरला.








