महाराष्ट्र

सोलापुरात रुक्मिणी महोत्सवाची सुरुवात; महिला बचत गटांना कोट्यवधींचा निधी

उमेदीच्या बळावर प्रत्येक महिला होणार 'लखपती दीदी'- पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापुरात रुक्मिणी महोत्सवाची सुरुवात; महिला बचत गटांना कोट्यवधींचा निधी

उमेदीच्या बळावर प्रत्येक महिला होणार ‘लखपती दीदी’- पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर (जिमाका) :- राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी शासन कटिबद्ध असून ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जयकुमार गोरे यांनी केले.

नॉर्थ कोर्ट मैदान, सोलापूर येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (उमेद) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महोत्सवा’चे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद सदस्य चेतन केदार, नगरसेविका रोहिणी तडवळकर तसेच प्रकल्प संचालक श्री. जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*महिलांना वर्षभर हक्काची बाजारपेठ*

मार्गदर्शन करताना पालकमंत्री गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा महोत्सवांची गरज आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य पॅकिंग, दर्जा व विपणन दिल्यास त्यांना अधिक नफा मिळू शकतो.

ग्रामीण भागातील महिलांनी दूध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, गाईपालन यांसारख्या व्यवसायांकडे वळावे. प्रत्येक गावात महिला बचत गटांचा प्रभाग संघ स्थापन व्हावा, तसेच बैठकीसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*‘उमेद मॉल’ सोलापुरासाठी मंजूर*

महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी ‘उमेद मॉल’ मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. या मॉलमुळे जिल्ह्यातील महिलांना वर्षभर विक्रीची संधी उपलब्ध होणार असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत असे मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यक्रमादरम्यान महिला स्वयंसहायता समूहांना ३२ कोटी ९ लाख ४० हजार रुपयांचा समुदायिक गुंतवणूक निधी धनादेश स्वरूपात वितरित करण्यात आला. तसेच बँक कर्जवाटप अंतर्गत २ कोटी २५ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

उमेद अंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या महिला फेडरेशनच्या नोंदणी प्रमाणपत्राचे वितरणही यावेळी करण्यात आले. सन २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यातील उद्दिष्टे पूर्ण केलेल्या प्रत्येक तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

*८० स्टॉल्स; नागरिकांना भेटीचे आवाहन*

या महोत्सवात महिला बचत गटांचे सुमारे ८० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विविध हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, कृषीपूरक उत्पादने व इतर साहित्याचे प्रदर्शन व विक्री येथे सुरू आहे.

हा महोत्सव १ ते ५ मार्च २०२६ दरम्यान नॉर्थ कोर्ट मैदान येथे आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा समारोप प्रकल्प संचालक श्री. जगताप यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!