तहसील कार्यालयात लाचेचा सापळा; १३ हजार स्वीकारताना लिपिक रंगेहात पकडला

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
संगमनेर येथील तहसीलदार कार्यालयात सुरू असलेल्या ‘गुप्त व्यवहाराचा’ अखेर पर्दाफाश झाला आहे. मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने रंगेहात पकडल्याने संपूर्ण कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक कैलास खाडे याने संबंधित नागरिकाकडून मालमत्तेच्या वाटप पत्रासाठी १३ हजार रुपयांची मागणी केली होती. वारंवार मागणी होत असल्याने संबंधित नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर कार्यालयाशी संपर्क साधत तक्रार नोंदवली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने अचानक धाड टाकत कैलास खाडे याला रंगेहात पकडले. १३ हजार रुपयांच्या नोटांसह त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईनंतर संगमनेर तहसीलदार कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडून करण्यात येत आहे. संबंधित लिपिकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारी कार्यालयांतील अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे. प्रशासन यावर कडक पावले उचलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



