सीईओ कुशल जैन यांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; सोलापूर जिल्ह्यात शाश्वत जीवनशैली सप्ताह!
१ ते ७ नोव्हेंबरदरम्यान सात दिवस सात उपक्रम; पाणी, वीज बचत आणि प्लास्टिकमुक्तीवर विशेष भर
सीईओ कुशल जैन यांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; सोलापूर जिल्ह्यात शाश्वत जीवनशैली सप्ताह!
१ ते ७ नोव्हेंबरदरम्यान सात दिवस सात उपक्रम; पाणी, वीज बचत आणि प्लास्टिकमुक्तीवर विशेष भर
सोलापूर : पर्यावरणाचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
‘One Week, Seven Actions, One Planet’ अर्थात ‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मिशन LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत दैनंदिन जीवनातील साध्या-सोप्या कृतींमधून पर्यावरणाचे संरक्षण करता येते, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या सप्ताहामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, ऊर्जा बचत, पाणी संवर्धन, शाश्वत अन्नप्रणाली, एकल वापर प्लास्टिकला नकार, ई-कचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन अशा सात विषयांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ नोव्हेंबर रोजी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी मिशन LiFE शपथ, योग, व्यायाम, प्रभात फेरी आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करून अनावश्यक वीज वापर टाळण्याचे आवाहन करण्यात येईल. ३ नोव्हेंबर रोजी पाणी बचत, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलस्रोतांचे संरक्षण यावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
४ नोव्हेंबर रोजी शाश्वत अन्नप्रणालीचा संदेश देताना तृणधान्यांचा वापर, अन्नाची नासाडी टाळणे आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती याबाबत जनजागृती केली जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी एकल वापर प्लास्टिकचा त्याग, कापडी पिशव्यांचा वापर आणि प्लास्टिक संकलन मोहिमेवर भर देण्यात येईल.
६ नोव्हेंबर रोजी ई-कचरा संकलन व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर ७ नोव्हेंबर रोजी परिसर स्वच्छता, कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण आणि Reduce-Reuse-Recycle अर्थात कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांच्या सहभागातून पर्यावरणविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पाणी वाचविणे, वीज बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे अशा छोट्या कृतींमधून पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान देता येते.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी शाश्वत जीवनशैली सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात व्यापक स्वरूपात पोहोचवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले आहे.



