सोलापूर

जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन

२५ महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ; ग्रामीण महिला उद्योजिकांच्या स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा

जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन

२५ महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ; ग्रामीण महिला उद्योजिकांच्या स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा

सोलापूर : ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला उद्योजिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद आवारात आयोजित करण्यात आलेल्या ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या हस्ते आज सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) उत्साहात करण्यात आले. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आणि मेहनतीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू, फराळाचे पदार्थ आणि सजावटीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हीच संधी साधत सोलापूर जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या सुकामेवा, हस्तकला साहित्य, दिवाळी फराळ, पणत्या, आकाशकंदील तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या महोत्सवात करण्यात येत आहे. फटाके वगळता दिवाळीशी संबंधित विविध साहित्य येथे उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील एकूण २५ स्वयंसहायता समूहांनी या महोत्सवात सहभाग घेतला असून, त्यांच्या उत्पादनांसाठी आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सना उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी केली. तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचे आणि महिला उद्योजिकांच्या कार्याचे कौतुक केले.

या महोत्सवामुळे महिला बचत गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता, स्वावलंबन आणि आर्थिक आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरत आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार दिवाळी साहित्य व फराळाचे पदार्थ तुलनेने कमी दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव-२०२६’ हा केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम नसून ग्रामीण संस्कृती, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा आनंदोत्सव ठरत आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, प्रकल्प संचालक जगताप, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महोत्सवाचे ठिकाण : जिल्हा परिषद आवार, सोलापूर
कालावधी : २ व ३ नोव्हेंबर २०२६
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!