महाराष्ट्र

तलाठी ते तहसीलदार : राजशेखर लिंबारे यांची संघर्षातून घडलेली यशोगाथा

तलाठी ते तहसीलदार : राजशेखर लिंबारे यांची संघर्षातून घडलेली यशोगाथा

सोलापूर :- (विशेष वृत्त) उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या साध्या गावातून निघालेला एक तरुण आज महाराष्ट्राच्या महसूल प्रशासनात ठसा उमटवत आहे. तलाठी पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तहसीलदार पदापर्यंत पोहोचला असून, ही केवळ पदोन्नतीची कहाणी नाही तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक सेवेची प्रेरणादायी यशोगाथा आहे.

*गरिबीतून उभारी*

शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची. शिक्षण घेताना अनेकदा पैशांची चणचण, सामाजिक दबाव आणि भविष्याची अनिश्चितता — पण डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं, “प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांसाठी काम करायचं.”
कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि महसूल खात्यात प्रवेश मिळवला.

तलाठी म्हणून त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे कार्यारंभ केला. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे, तक्रारींचे तत्पर निवारण करणे आणि कामात पारदर्शकता राखणे—या गुणांमुळे ते लवकरच लोकांच्या मनात घर करू लागले.

यानंतर मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार अशी पदे सांभाळत त्यांनी प्रशासनातील प्रत्येक टप्पा अनुभवला.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेकडो गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.

अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ येथे कार्यरत असताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी, निराधार नागरिक यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.

मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या वेगामुळे कार्यालय परिसरात वाहनांची गर्दी वाढली, अशी चर्चा होती. प्रत्येक गावातील नागरिकांशी संवाद साधून समस्या निवारण करण्याची त्यांची पद्धत वेगळी ठरली.

त्यांच्या बदलीच्या वेळी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, हे त्यांच्या लोकाभिमुख कार्याचे द्योतक आहे.

गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे तहसीलदार म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. मात्र आजही अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरच्या जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केलेली विश्वासाची नाळ कायम आहे.

*तरुणासाठी प्रेरणादायी संदेश*

आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि नोकरीतील अनिश्चितता—या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी मिळवलेले यश आजच्या ग्रामीण तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
“जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची भावना असेल तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही,” हा संदेश त्यांच्या प्रवासातून स्पष्टपणे दिसून येतो.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!