सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची कोल्हापूरला प्रतिनियुक्ती

सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांची कोल्हापूरला प्रतिनियुक्ती

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता महादेव पाटील यांची महिला व बाल विकास विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना), कोल्हापूर शहर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दि. २९ जुलै २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, कोल्हापूर येथे त्यांची बदली ही प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

जुलै २०२३ मध्ये श्रीमती स्मिता पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) पदाचा कार्यभार स्वीकारला होता. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या बदलीनंतर सुमारे सात महिने हे पद रिक्त होते. त्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती करून सोलापूर जिल्हा परिषदेला सक्षम प्रशासकीय नेतृत्व दिले.

सोलापूरमध्ये जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळात श्रीमती पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली. कर्मचारी प्रशासन, बदली प्रक्रिया, पदोन्नती, शिस्तभंग विषयक कामकाज, आस्थापना, सभांचे नियोजन, कार्यालयीन प्रशासन तसेच विविध विभागांमधील समन्वयाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्हा परिषदेतील अनेक प्रशासकीय निर्णय वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी समन्वय राखून काम करण्याची त्यांची शैली विशेष उल्लेखनीय मानली जाते. विविध विभागांची कामे कोणताही विलंब न होता पूर्ण व्हावीत, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.

सोलापूरपूर्वी त्यांनी आंबेगाव (पुणे), लोणार (बुलढाणा), माळशिरस (सोलापूर) येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेत पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर पदोन्नतीवर चंद्रपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि जुलै २०२३ मध्ये त्या पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.

आता शासनाने त्यांची महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना), कोल्हापूर शहर या गट-अ संवर्गातील पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती प्रारंभी तीन वर्षांसाठी किंवा नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीसाठी राहणार आहे.

कोल्हापूर येथे झालेली ही बदली श्रीमती स्मिता पाटील यांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल मानली जात असून, महिला व बाल विकास विभागातील कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, सोलापूर जिल्हा परिषदेत त्यांच्या जागी नव्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोणाची होणार, याकडे प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!