सोलापूर

नऊ दिवस उलटले, तरीही कारवाई नाही; बेकायदेशीर वाळू उपशाप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचा प्रशासनावर संताप

"दोषी अधिकारी व संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू" – जिल्हाध्यक्ष तानाजी शिवशरण

नऊ दिवस उलटले, तरीही कारवाई नाही; बेकायदेशीर वाळू उपशाप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचा प्रशासनावर संताप

“दोषी अधिकारी व संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू” – जिल्हाध्यक्ष तानाजी शिवशरण

सोलापूर (प्रतिनिधी) : भंडारकवठे, खानापूर आणि तेलगाव भीमा परिसरातील कथित बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संघटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी (आण्णा) शिवशरण यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, संघटनेने आंदोलन सुरू करताना महसूल, खनिकर्म, पोलीस आणि इतर संबंधित विभागांकडे कथित बेकायदेशीर वाळू उपशाबाबत पुराव्यासह तक्रार केली होती. दोषी ठेकेदार, वाहन मालक तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र,नऊ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.

शिवशरण यांनी आरोप केला की, कारवाईला होत असलेल्या विलंबामुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोबल वाढत असून शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, आरटीओ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.

याशिवाय कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाची संयुक्त पाहणी करून पंचनामा करावा, उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री व वाहने जप्त करावीत आणि शासनाच्या महसुलाची झालेली हानी संबंधितांकडून दंडासह वसूल करावी, अशी मागणीही पुन्हा करण्यात आली आहे.

“प्रशासनाने आता तरी जागे होऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. आंदोलनाची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची राहील,” असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी (आण्णा) शिवशरण यांनी दिला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!