भीमा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा इशारा; नदीपात्रात जाणे टाळा, जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलवा
स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातील आवक वाढली; पूर नियंत्रणासाठी विसर्गात वाढ, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

भीमा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा इशारा; नदीपात्रात जाणे टाळा, जनावरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलवा
स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणातील आवक वाढली; पूर नियंत्रणासाठी विसर्गात वाढ, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
सोलापूर, दि. 31 जुलै : स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वाढली असून पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (31 जुलै) दुपारी 3.30 वाजल्यापासून 75 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची आवक कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात कोणत्याही कारणास्तव उतरू नये, मासेमारी, पोहणे किंवा इतर हालचाली टाळाव्यात, तसेच नदीकाठावर ठेवलेले शेतीचे साहित्य, यंत्रसामग्री आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, नदीलगतच्या सखल भागातील नागरिकांना तात्काळ सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सूचनेद्वारे देण्यात आली आहे.



