डॉ. राजेंद्र घुली, डॉ. इरेश स्वामींसह पाच मान्यवर ‘चिंतामणी रत्न’ पुरस्काराने सन्मानित
गुरुवरांप्रती श्रद्धा व निष्ठेने केलेल्या सेवेला गौरव; काशी पीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान

डॉ. राजेंद्र घुली, डॉ. इरेश स्वामींसह पाच मान्यवर ‘चिंतामणी रत्न’ पुरस्काराने सन्मानित
गुरुवरांप्रती श्रद्धा व निष्ठेने केलेल्या सेवेला गौरव; काशी पीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सोलापूर : गुरुवरांप्रती श्रद्धा, निष्ठा आणि धार्मिक-सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘चिंतामणी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते आणि जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी अश्विनी रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र घुली, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, दानम्मा देवी गुडापूरचे ट्रस्टी सिद्धया स्वामी-हिरेमठ, श्री बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी तसेच स्व. मल्लिकार्जुन वाकळे यांना मरणोत्तर ‘चिंतामणी रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या तपोनुष्ठानाच्या प्रसंगी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. धार्मिक परंपरा, अध्यात्मिक संस्कार तसेच समाजहिताच्या कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, आमदार बसवराज पाटील, प्रवीण स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शेकडो भाविक उपस्थित होते.
यावेळी जगद्गुरुंनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक व समाजोपयोगी कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सन्मान झाल्याने उपस्थित भाविकांनीही समाधान व्यक्त केले.



