अक्कलकोटच्या भविष्यातील वाहतुकीसाठी सचिन कल्याणशेट्टींचा पुढाकार; रिंग रोडसाठी गडकरींची भेट
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास पूर्ण करण्याचा केंद्राकडे आग्रह

अक्कलकोटच्या भविष्यातील वाहतुकीसाठी सचिन कल्याणशेट्टींचा पुढाकार; रिंग रोडसाठी गडकरींची भेट
शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास पूर्ण करण्याचा केंद्राकडे आग्रह
नवी दिल्ली : अक्कलकोट शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील वाढणारी वाहतूक आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन शहराला पूर्ण वळसा देणारा रिंग रोड पूर्ण करण्यासाठी सचिन कल्याणशेट्टी यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. परिवहन भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत अक्कलकोटच्या रिंग रोडसह प्रस्तावित बायपासच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अक्कलकोट शहराच्या विकासाच्या दृष्टीने रिंग रोड हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, मैंदर्गी रोडपासून सोलापूर रोडपर्यंत नवीन बायपास उभारून विद्यमान रिंग रोडशी जोडणी करण्याची मागणी कल्याणशेट्टी यांनी गडकरी यांच्याकडे केली. या मार्गामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरून वळविणे शक्य होणार आहे.

अक्कलकोट–तडवळ–कोर्सेगाव–टाकळी SH-211 या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय NH-548B, NH-150E आणि NH-52 या प्रमुख मार्गांच्या विकासामुळे आगामी काळात अक्कलकोट परिसरातील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अक्कलकोट हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने सध्या देखील शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा असते. धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढतो. त्यातच राष्ट्रीय महामार्गांच्या विकासामुळे अवजड व मल्टी-ॲक्सेल वाहनांची संख्या वाढल्यास शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शहरातील नागरिकांची सुरक्षितता, भाविकांची सोय आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन रिंग रोड पूर्ण करणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका कल्याणशेट्टी यांनी मांडली.
सध्या NH-150E मुळे अक्कलकोट रिंग रोडचा काही भाग उपलब्ध आहे. उर्वरित भाग NH-548B ला जोडून मैंदर्गी रोड ते सोलापूर रोड असा बायपास पूर्ण केल्यास अक्कलकोट शहराभोवती वाहतुकीचे प्रभावी वर्तुळ तयार होऊ शकते. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच अवजड वाहने शहराबाहेरून वळविणे शक्य होईल.
या प्रकल्पामुळे अक्कलकोटच्या वाहतूक व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी मिळण्यासोबतच नागरिक, व्यापारी, वाहनचालक आणि भाविकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
अक्कलकोटच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या रिंग रोडच्या प्रश्नावर सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला असून, बायपासला लवकर मंजुरी मिळावी यासाठी पुढील काळातही सातत्याने प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.



