लिंगायत समाजाच्या स्वतंत्र दफनभूमीसाठी वनजमीन देण्याचा निर्णय
गावपातळीवर मागणी होताच उपलब्धतेनुसार वन विभागाच्या जमिनीबाबत कार्यवाही; वनमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही

लिंगायत समाजाच्या स्वतंत्र दफनभूमीसाठी वनजमीन देण्याचा निर्णय
गावपातळीवर मागणी होताच उपलब्धतेनुसार वन विभागाच्या जमिनीबाबत कार्यवाही; वनमंत्री गणेश नाईक यांची ग्वाही
मुंबई : राज्यात स्वतंत्र दफनभूमीची सुविधा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये लिंगायत समाजाच्या मागणीनुसार वन विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी संबंधित गावांकडून मागणी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
सोलापूरचे माजी आमदार व लिंगायत समाजाचे नेते शिवशरण अण्णा पाटील तसेच लिंगायत चळवळीचे अभ्यासक व समाजसेवक डॉ. बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी राज्यातील ज्या गावांमध्ये लिंगायत समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

गावातील विद्यमान स्मशानभूमीची जागा अपुरी असेल किंवा गायरान तसेच गावठाणाची पर्यायी जागा उपलब्ध नसेल, तर परिसरात राखीव वनजमीन उपलब्ध असल्यास संबंधित मागणीचा विचार करून ती जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

लिंगायत धर्मातील अंत्यसंस्काराची पद्धत अन्य समाजांच्या तुलनेत वेगळी असल्याने अनेक गावांमध्ये स्वतंत्र दफनभूमीची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाच्या धार्मिक परंपरा व अंत्यसंस्काराच्या पद्धतीचा विचार करून गावपातळीवर स्वतंत्र दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
• जुळे सोलापूरमधील नागरिकांचाही प्रश्न मांडला •
यावेळी जुळे सोलापूर येथील कंबर तलाव परिसरातील २२ गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांचा वनजमिनीशी संबंधित प्रश्नही वनमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. संबंधित नागरिकांना वन विभागाची जागा हस्तांतरित करून मालकी हक्क मिळवून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
याशिवाय काशी विश्वनाथ मंदिरातील लिंगपूजेसाठी स्वतंत्र रहदारी उपलब्ध करून देणे तसेच गुरुदेव समाजसेवा मंडळाच्या जागेत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागेचा ताबा देण्याच्या मागण्यांचे निवेदनही वनमंत्र्यांना देण्यात आले.
• संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश •
शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध प्रश्नांची वनमंत्री गणेश नाईक यांनी गांभीर्याने दखल घेतली. संबंधित विषयांवर नियमांनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे लिंगायत समाजाच्या स्वतंत्र दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड झाल्याचे मानले जात आहे.
या बैठकीस सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह, कोल्हापूरचे लिंगायत नेते धनंजय महाजन, मदन पोलके सर, गंगाधर स्वामी आदी उपस्थित होते.



