महाराष्ट्र

बातम्यांसाठी रात्रंदिवस धावणाऱ्या पत्रकारांच्या घराचे स्वप्न साकार; २४ वर्षांनंतर २३८ सदनिकांची सोडत

पत्रकारांच्या घरकुलाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात; सोडतीने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

बातम्यांसाठी रात्रंदिवस धावणाऱ्या पत्रकारांच्या घराचे स्वप्न साकार; २४ वर्षांनंतर २३८ सदनिकांची सोडत

पत्रकारांच्या घरकुलाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात; सोडतीने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

सोलापूर : समाजातील सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या घराचा प्रश्न मात्र तब्बल २४ वर्षे प्रलंबित राहिला. अनेक वर्षांचा पाठपुरावा, प्रशासकीय अडथळे आणि विविध स्तरांवरील प्रयत्नांनंतर अखेर या संघर्षाला यशाची दिशा मिळाली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सोलापूर उपविभागांतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या योजनेत १२६ अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) आणि ११२ अल्प उत्पन्न गटातील (LIG) सदनिकांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गृहस्वप्न प्रत्यक्षात येण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

पत्रकाराचे काम हे केवळ बातमी लिहिण्यापुरते मर्यादित नसते. एखादी घटना घडली की दिवस असो वा रात्र, पाऊस असो वा उन्हाळा, पत्रकार घटनास्थळी पोहोचतो. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतो, प्रशासनाचे लक्ष वेधतो आणि संबंधित प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतो. या धावपळीत अनेक पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देण्याबरोबरच स्वतःच्या घराचा प्रश्नही मागे ठेवला. मर्यादित उत्पन्न, वाढते घरभाडे आणि कुटुंबाच्या वाढत्या गरजा अशा परिस्थितीत स्वतःच्या घराचे स्वप्न अनेक पत्रकारांसाठी वर्षानुवर्षे केवळ स्वप्नच राहिले.

याच पार्श्वभूमीवर सोलापूरमधील पत्रकार संघटनांनी घराच्या मागणीसाठी सुरू केलेला पाठपुरावा तब्बल दोन तपांपेक्षा अधिक काळ चालला. जागा निश्चित करण्यापासून प्रकल्पाची मंजुरी, भूमिपूजन, बांधकाम आणि अखेर सोडत या प्रत्येक टप्प्यावर पत्रकार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शनिवारची सोडत ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राहता २४ वर्षांच्या संघर्षाचा महत्त्वाचा टप्पा ठरली.

आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी केलेल्या प्रदीर्घ पाठपुराव्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याची आठवण करून देत, पत्रकारांना घर मिळेपर्यंत पुढील पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करत गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घराची चावी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करताना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही उल्लेख केला. पत्रकारांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात दिलेल्या मार्गदर्शनाचा आपण नेहमी आदर करतो, असे त्यांनी सांगितले.

“राजकारण्यांचे ग्लॅमर पाच-दहा वर्षांचे असते; मात्र पत्रकारांचे ग्लॅमर कायम असते. अपवाद फक्त आर्थिक परिस्थितीचा,” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांच्या वास्तवाकडे लक्ष वेधले.

समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावणारे पत्रकार अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या कुटुंबालाही सुरक्षित आणि स्वतःचे घर मिळावे, ही अपेक्षा असते. त्यामुळे सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर तसेच अन्य माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकारांच्या कार्यपद्धतीचा विशेष उल्लेख केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या मांडणारा पत्रकार मात्र स्वतःच्या अडचणी अनेकदा सांगत नाही, असे त्यांनी नमूद केले.

सोलापुरात पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांच्या आवासाचा विषय प्राधान्याने घेतल्याचे सांगत, लवकरात लवकर पत्रकारांचा आपल्या नव्या घरात गृहप्रवेश व्हावा, अशी मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या नव्या घरात प्रवेश व्हावा आणि घरात दूध उकळण्याचा मंगल सोहळा व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूमध्ये नव्या घरात प्रवेश करताना दूध उकळण्याची परंपरा असल्याचा संदर्भ देत, सोलापुरातील पत्रकारांच्या घरातही लवकरच असा मंगल प्रसंग यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाशी असलेले आपले नाते अधोरेखित केले.

या प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे त्यांनी सांगितले. या निधीमुळे प्रत्येक सदनिकेच्या किमतीत अंदाजे २ ते २.५ लाख रुपयांपर्यंतची घट होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करता हा दिलासा महत्त्वाचा मानला जात आहे.

सोडत कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, प्र. कार्यकारी अभियंता मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभागाचे सूरज अजनाळकर आदी उपस्थित होते.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, संपादक प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हाडाचे सोमनाथ रावळे, गोरक्षनाथ कुलट, बालकृष्ण दावनपल्ली, प्रमोद शिंदे, सतीश लष्करे, हरिदास देशमुख, सुमित उभाळे, वर्षा घोरपडे, सुनीता गोडसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल शिळीमकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली ही सोडत अनेक पत्रकार कुटुंबांसाठी भावनिक आणि समाधानाचा क्षण ठरली. वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात संसार करणाऱ्या, छोट्या जागेत कुटुंब सांभाळणाऱ्या आणि पत्रकारितेच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना आता स्वतःच्या घराची आशा निर्माण झाली आहे.

समाजाच्या समस्या मांडताना स्वतःच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या पत्रकारांच्या २४ वर्षांच्या प्रवासाला या सोडतीने नवी दिशा दिली असून, २३८ कुटुंबांच्या गृहस्वप्नाचा पाया आता प्रत्यक्षात उभा राहिला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!