सोलापूर

धोकादायक शाळा खोल्यांवर तातडीने निर्णय घ्या; इंद्रजीत पवारांचे प्रशासनाला निर्देश

प्रलंबित बांधकामे, वसतिगृहातील सुविधा आणि धोकादायक विहिरींचाही घेतला आढावा; अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

धोकादायक शाळा खोल्यांवर तातडीने निर्णय घ्या; इंद्रजीत पवारांचे प्रशासनाला निर्देश

प्रलंबित बांधकामे, वसतिगृहातील सुविधा आणि धोकादायक विहिरींचाही घेतला आढावा; अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

सोलापूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक शाळा खोल्या, प्रलंबित बांधकामे आणि शासकीय इमारतींच्या सुरक्षेबाबत तातडीने कार्यवाही करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सभा इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय बांधकामांचा प्रगती आढावा घेण्यासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षा, धोकादायक शाळा खोल्या, जवाहरलाल नेहरू वसतिगृहातील सुविधा, ई-निविदा प्रक्रिया आणि धोकादायक विहिरी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मागील बैठकींमध्ये बांधकाम विभागाला देण्यात आलेल्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची मुद्देनिहाय माहिती असलेला अनुपालन अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याचे निर्देश इंद्रजीत पवार यांनी दिले.

जिल्ह्यातील धोकादायक शाळा खोल्यांची अद्ययावत माहिती शिक्षण विभागाला देण्याचे निर्देश मे २०२६ मध्ये देण्यात आले होते. या आदेशानंतर बांधकाम विभागाने नेमकी कोणती कार्यवाही केली, याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले.

शाळांच्या स्लॅब किंवा इतर बांधकामाची कामे सुरू असताना संबंधित शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी करावी, अशी अपेक्षाही बैठकीत व्यक्त करण्यात आली. कामाच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी जीओटॅग छायाचित्रे देयकासोबत जोडण्याच्या प्रक्रियेचीही तपासणी करण्याचे निर्देश इंद्रजीत पवार यांनी दिले.

जवाहरलाल नेहरू वसतिगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीची सद्यस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

वसतिगृहातील गाळेधारकांचे भाडेपट्टा करार, थकीत भाडे, पोटभाडे तसेच अतिक्रमणाच्या प्रश्नावर यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनांवर प्रशासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली, याची माहितीही मागविण्यात आली.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणारे निवास, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि अन्य मूलभूत सुविधा यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश इंद्रजीत पवार यांनी प्रशासनाला दिले.

तसेच गेल्या पाच वर्षांत वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वर्षनिहाय संख्या आणि संबंधित माहिती अद्ययावत करून समितीसमोर सादर करण्यास सांगण्यात आले.

जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या ई-निविदा प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन आणि पारदर्शकता राखली जावी, यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील धोकादायक विहिरींच्या प्रश्नावरही आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

बांधकाम समितीच्या बैठकीत केवळ नवीन कामांच्या मंजुरीपुरता विषय न ठेवता विद्यार्थ्यांची सुरक्षा, शासकीय मालमत्तेचे संरक्षण, वसतिगृहातील सुविधा, बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी आणि निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्यावर इंद्रजीत पवार यांनी विशेष भर दिला.

यावेळी बांधकाम समितीचे सदस्य नेताजी खंडागळे, अतुल पवार, पूजा ढेरे, सचिन जाधव, विकास बुळा आदी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!