बीबी दारफळच्या शेतकऱ्यांसाठी शिरापूर उपसा सिंचनाचे पाणी तलावात सोडण्याची मागणी
शहाजी पवार, राजेंद्र राऊत यांनी केली पाहणी; महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट
बीबी दारफळच्या शेतकऱ्यांसाठी शिरापूर उपसा सिंचनाचे पाणी तलावात सोडण्याची मागणी
शहाजी पवार, राजेंद्र राऊत यांनी केली पाहणी; महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट
सोलापूर : बीबी दारफळ व परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांनी विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत बीबी दारफळ परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती घेतली.
पाहणीदरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी लक्षात आल्यानंतर शहाजी पवार यांनी तातडीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महामंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि कार्यकारी अभियंता म्याकल यांच्याशी चर्चा करून शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी तलावात सोडण्याबाबत मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असून, परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनीही या मागणीची दखल घेत तातडीने आवश्यक कार्यवाही करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिल्याची माहिती देण्यात आली.
बीबी दारफळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासन आणि संबंधित सिंचन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या वेळी वैभव पाटील, महादेव कदम, दशरथ पवार, भारत जगदाळे, सचिन चौरे, दादा पठाण, नाना पठाण आदी उपस्थित होते.



