शिक्षक पदभरतीसाठी 349 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
पवित्र प्रणालीअंतर्गत प्रक्रिया; उमेदवारांनी वेळेत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांचे आवाहन

शिक्षक पदभरतीसाठी 349 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
पवित्र प्रणालीअंतर्गत प्रक्रिया; उमेदवारांनी वेळेत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांचे आवाहन
सोलापूर, : पवित्र प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 अंतर्गत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या शिक्षक पदनिवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मराठी माध्यमातील निवड यादीतील अ.क्र. 1 ते 349 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.
याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सोलापूर, विशाल मुळे यांनी सांगितले की, पवित्र पोर्टलवर प्राप्त गुणांच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार मूळ कागदपत्रे व आवश्यक छायांकित प्रतींसह स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
02 सप्टेंबर रोजी निवड यादीतील अ.क्र. 1 ते 175, तर 03 सप्टेंबर रोजी अ.क्र. 176 ते 349 या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.
ही प्रक्रिया जवाहरलाल नेहरू मुलांचे वसतिगृह, पार्क चौक, सोलापूर येथे सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नमूद केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे, साक्षांकित छायांकित प्रती आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांची पडताळणी करताना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उमेदवार निर्धारित दिवशी अनुपस्थित राहिल्यास त्याचा परिणाम पुढील निवड प्रक्रियेवर होऊ शकतो, असेही शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी स्पष्ट केले.
“पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराने निर्धारित वेळेत उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्वतयारी करून वेळेत उपस्थित राहावे,” असे आवाहन शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी केले आहे.




