धर्मा महादेव गायकवाड यांचे निर्वाण ; ज्येष्ठ पत्रकार डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांना पितृशोक
धर्मा महादेव गायकवाड यांचे निर्वाण ; ज्येष्ठ पत्रकार डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांना पितृशोक
सोलापूर (प्रतिनिधी) – रेल्वेच्या C&W विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, प्रबुद्ध प्रकाशनचे प्रकाशक आणि विपश्यना साधक तसेच ज्येष्ठ धम्मशील कार्यकर्ते धर्मा महादेव गायकवाड (वय ८७) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निर्वाण झाले. दुपारी ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मा महादेव गायकवाड यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर १९५६ रोजीच्या अंत्यदर्शनाचा जवळून साक्षीदार होण्याचा योग लाभला होता. ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड यांच्याविषयी त्यांना विशेष आस्था होती. विपश्यना साधना, बौद्ध धम्माचा प्रसार आणि सामाजिक कार्याशी त्यांचे दीर्घकाळ नाते राहिले. त्यांच्या निधनाने धम्म चळवळीतील एक ज्येष्ठ आणि समर्पित कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवारी रात्री १० वाजता विजापूर नाका, गौतम नगर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानापासून निघणार आहे. मोदी स्मशानभूमीत बौद्ध धम्मपद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कीर्तिपाल, मुली अंजली (चंदा), प्रा. मंगल, सुरेखा, सून प्रा. सुनीता, जावई अशोक, विजय तसेच नातवंडे मिनाक्षी, डॉ. सोनल, अभिजीत, शीतल, सुमेधा, प्रबुद्ध, आकांक्षा, आदर्श, पर्तुंडे, चिकू, पीयू, साक्षी, परी, वरुण असा मोठा परिवार आहे.
धर्मा महादेव गायकवाड यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर तसेच परिचित, आप्तेष्ट आणि धम्म चळवळीतील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.



