सोलापूर

सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये स्वच्छतेची महास्वच्छता मोहीम; १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’

सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये स्वच्छतेची महास्वच्छता मोहीम; १७ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा (SHS)-२०२६’ अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवून प्रत्येक गावात स्वच्छतेचे उपक्रम पोहोचवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेत विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांची बैठक सीईओ कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव तसेच ग्रामविकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानाची मध्यवर्ती संकल्पना ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ अशी आहे. स्वच्छतेच्या कामात प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी तालुकानिहाय नियोजन करून ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक तालुक्यातील अडचणीची, अस्वच्छ आणि वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे निश्चित करून त्यांचे मॅपिंग (Mapping) करण्यात येणार आहे. अशा ठिकाणी निश्चित कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यावर भर देण्यात येणार आहे.

स्वच्छतेची सवय लहान वयापासून लागावी यासाठी शाळांमध्ये ‘स्वच्छता ज्ञान यात्रा’, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि ‘स्वच्छता व जलसंचय संवाद’ यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. युवकांनाही विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

स्वच्छता राखण्यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना पीपीई किट्स आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचेही नियोजन आहे.

अभियानातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक श्रमदान आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, बचत गट, युवक, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक आणि अन्य नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभियानात कचरा वर्गीकरण मोहीम, ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा यांसह विविध लोकसहभागी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. २७ सप्टेंबरच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष स्वच्छता व जनजागृती उपक्रम घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याशिवाय ‘Waste to Wealth’ अर्थात कचऱ्यातून संपत्ती आणि ‘Waste to Art’ अर्थात कचऱ्यातून कलाकृती या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर आणि त्यातून उपयुक्त वस्तू व कलाकृती तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

अभियानाचा तालुकास्तरीय सविस्तर कृती आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, बचत गट, युवक आणि प्रतिष्ठित नागरिकांना अभियानात सक्रियपणे सहभागी करून घेण्यात यावे, असेही सांगण्यात आले.

अभियानांतर्गत दररोज राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती आणि छायाचित्रे ‘स्वच्छता ही सेवा-२०२६’च्या अधिकृत पोर्टलवर विनाविलंब अपलोड करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष बैठका आणि विविध उपक्रमांचे आयोजन करून अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी अभियानाची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे करावी. त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!