सोलापूर

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

सोलापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वेळापूर आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवत्ता कक्ष (DQC) बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,
तसेच DIET चे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याता अरुण पाटील, शोभा मिसाळ, अधिव्याख्याता डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ.गजेंद्र जमादार
जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. विशेषतः Performance Grading Index for District (PGI-D) या निर्देशांकाच्या आधारे सोलापूर जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. विविध घटकांमध्ये जिल्ह्याची सद्यस्थिती, इतर आघाडीच्या जिल्ह्यांशी तुलना, उणिवा, सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे आणि आगामी कालावधीसाठी कृती आराखडा यावर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रत्येक स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने वाढ होण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षा, विद्यार्थी उपस्थिती, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा कृती आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख आणि प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ यांनी PGI-D मधील विविध निकषांचे सविस्तर सादरीकरण करून जिल्ह्याची शैक्षणिक कामगिरी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. UDISE+, PARAKH, PRABANDH या विविध स्रोतांमधील माहिती अचूक व वेळेत भरली जाणे, डेटा पडताळणी, शाळास्तरावर नियमित शैक्षणिक पर्यवेक्षण, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वंकष मूल्यमापन, ICT साधनांचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष आढावा घेण्यात आला.

बैठकीत पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD) प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, अध्ययन निष्पत्ती, शाळा सुरक्षा, समुदाय सहभाग, शाळांची गुणवत्ता तपासणी तसेच तालुकास्तरीय गुणवत्ता कक्ष बैठकीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ठोस कृती आराखड्यानुसार काम करून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्ष बैठकीचे नियमित आयोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक शाळेपर्यंत शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी पोहोचवून विद्यार्थ्यांना दर्जेदार, समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!