उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा जिल्हा परिषदेत गौरव
समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या हस्ते सन्मान; लोकाभिमुख प्रशासनाची प्रशंसा

उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल; शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा जिल्हा परिषदेत गौरव
समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांच्या हस्ते सन्मान; लोकाभिमुख प्रशासनाची प्रशंसा
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा दिव्यांग समाज कल्याण अधिकारी सचिन नागनाथ जगताप यांचा त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय योगदानाबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम, दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शासनाच्या लाभदायी योजना पारदर्शकपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि प्रशासनातील समन्वयक म्हणून बजावलेली भूमिका यामुळे सचिन जगताप यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी बोलताना समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी, “कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता आणि लोकहिताचा दृष्टिकोन जपत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान होणे ही प्रशासनासाठी सकारात्मक बाब आहे. सचिन जगताप यांनी शिक्षण व दिव्यांग कल्याण क्षेत्रात केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना सचिन नागनाथ जगताप यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भविष्यातही प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सचिन जगताप यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उत्साहपूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा संपन्न झाला.



