शेळगी पुलावर भीषण अपघात;हिरकणी बस ट्रकवर आदळली, चालकासह महिला प्रवाशाचा मृत्यू
पहाटेच्या दुर्घटनेत ६ ते ७ प्रवासी जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

शेळगी पुलावर भीषण अपघात;हिरकणी बस ट्रकवर आदळली, चालकासह महिला प्रवाशाचा मृत्यू
पहाटेच्या दुर्घटनेत ६ ते ७ प्रवासी जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
सोलापूर, दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) : पुणे–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील शेळगी पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘हिरकणी’ बसचा चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ६ ते ७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, एसटी महामंडळाची ‘हिरकणी’ बस (क्रमांक MH 13 LB 0380) पुण्याहून हैदराबादकडे प्रवाशांना घेऊन जात होती. शुक्रवारी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास बस शेळगी पुलाजवळ पोहोचली असता समोरील ट्रकवर जोरदार आदळली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला, तर ट्रकलाही मोठे नुकसान झाले.

या भीषण अपघातात एसटी चालक दादाराव बनसोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच बसमधील एका अज्ञात महिला प्रवाशाने गंभीर दुखापतीमुळे जागीच प्राण गमावले. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि मदतीसाठी आरडाओरडा सुरू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना त्वरित शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर काही काळ पुणे–हैदराबाद महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.



