२५ लाखांची मागणी… १० लाख स्वीकारले! पुन्हा साडेपाच लाखांचा डाव; ब्रिजखाली पैसे घेताना दोघे ACB च्या जाळ्यात

२५ लाखांची मागणी… १० लाख स्वीकारले! पुन्हा साडेपाच लाखांचा डाव; ब्रिजखाली पैसे घेताना दोघे ACB च्या जाळ्यात
माळशिरस : एकीकडे गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कथितरित्या २५ लाख रुपयांची मागणी, त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामीन आणि विशिष्ट कायद्याची कलमे टाळण्यासाठी पुन्हा मोठ्या रकमेचा व्यवहार आणि अखेरीस तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी… या संपूर्ण कथित लाचेच्या प्रकरणाचा शेवट माळशिरस-पिलीव रोडवरील पालखी महामार्गाच्या ब्रिजखाली ACB च्या सापळ्यात झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने २८ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत आबा सावळा वळकंदे आणि महादेव पंढरी माने या दोन खासगी व्यक्तींना ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याचे ACB च्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ यांचीही नावे समोर आली आहेत.
ACB च्या माहितीनुसार, तक्रारदाराने २१ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे ACB कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या भावासह इतर व्यक्तींविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला.
तक्रारदाराने ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या भावासह इतरांविरुद्ध गुन्हा क्रमांक ५६४/२०२६ दाखल झाल्याचे ACB ने नमूद केले आहे.
यानंतर कथित लाचेच्या व्यवहाराला वेगळे वळण मिळाले.
ACB च्या प्रेसनोटनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस हवालदार अनिल शिंदे यांनी खासगी व्यक्ती आबा सावळा वळकंदे यांच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधला.
यावेळी, यापूर्वी २५ लाख रुपये दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता, असे सांगितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी तसेच पीसी अँड पीएनडीटी कायद्याची कलमे न लावण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपये आणि काम झाल्यानंतर स्वतःसाठी ५ लाख रुपये, अशी लाचेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यातील १० लाख रुपये स्वीकारले असून उर्वरित १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप ACBने नोंदवला आहे.
या तक्रारीनंतर ACB ने २४ ऑगस्ट रोजी लाच मागणीची पडताळणी केली.
या कारवाईदरम्यान खासगी व्यक्ती आबा वळकंदे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे संबंधित कामासाठी पोलिस हवालदार अनिल शिंदे आणि डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे ACB ने म्हटले आहे.
तसेच, गुन्ह्यातील इतर दोन आरोपींसाठी अनिल शिंदे यांनी यापूर्वी १० लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य केल्याचेही प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
मात्र, यानंतर कथित लाचेच्या व्यवहाराचा आणखी एक टप्पा समोर आला.
२७ ऑगस्ट रोजी ACB ने पुन्हा लाच मागणीची पडताळणी केली.
या वेळी खासगी व्यक्ती आबा वळकंदे आणि महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच त्यांना BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी ५ लाख रुपये आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे ACB ने नमूद केले आहे.
ही रक्कम २८ ऑगस्ट रोजी घेऊन येण्यास सांगण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे ACB ने सांगितले.
या कथित लाच मागणीसाठी पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ यांनी अपप्रेरणा दिल्याचा आरोपही प्रेसनोटमध्ये करण्यात आला आहे.
२८ ऑगस्ट रोजी ACB पुणे युनिटने सापळा कारवाई आयोजित केली.
माळशिरस-पिलीव रोडवरील पालखी महामार्गाच्या ब्रिजखाली, जानकर प्लॉटजवळ, माळशिरस येथे ही कारवाई करण्यात आली.
दुपारी २.३० वाजता, तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता त्यांना नोटीस देण्यासाठी पोलिस हवालदार राहुल वाघ यांच्यासाठी ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आबा वळकंदे आणि महादेव माने यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आल्याचे ACB च्या प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
या कारवाईनंतर माळशिरस पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACB ने सांगितले आहे.
या प्रकरणात ACB ने खालील व्यक्तींची नावे नमूद केली आहेत
• आबा सावळा वळकंदे, वय ४८ वर्षे, व्यवसाय खाजगी वाहन चालक, रा. वळकंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस.
• महादेव पंढरी माने, वय ३९ वर्षे, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस.
• अनिल महादेव शिंदे, पोलिस हवालदार, बक्कल क्रमांक १६५९, नेमणूक नातेपुते पोलिस स्टेशन; सध्या कर्तव्यार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज.
• राहुल मारुती वाघ, पोलिस हवालदार, बक्कल क्रमांक १८१८, माळशिरस पोलिस स्टेशन.
ACB च्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ आणि २ अर्थात आबा वळकंदे व महादेव माने यांना २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक श्रीमती निता मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी काम पाहिले.
सापळा पथकात पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहायक फौजदार राजेश बाटे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण तावरे, पोलिस कॉन्स्टेबल अश्विन कमकर, चालक पोलिस हवालदार दगडू सोनावणे आणि चालक पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांचा समावेश होता.
या कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक-१ अजित पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.



