24 तासांत चोरीचा उलगडा; अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या डी. बी. पथकाची दमदार कामगिरी
ज्येष्ठ महिलेची अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि रुपये १२,६०० रोख रक्कम हस्तगत; आरोपीला अटक, पोलिसांप्रती महिलेची कृतज्ञता

24 तासांत चोरीचा उलगडा; अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या डी. बी. पथकाची दमदार कामगिरी
ज्येष्ठ महिलेची अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि रुपये १२,६०० रोख रक्कम हस्तगत; आरोपीला अटक, पोलिसांप्रती महिलेची कृतज्ञता
अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अवघ्या 24 तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली असून, ज्येष्ठ महिलेची चोरीस गेलेली अर्ध्या तोळ्याची बोरमाळ आणि पेन्शनची रु१२,६०० रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाईमुळे नागरिकांमधून अक्कलकोट उत्तर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्रीमती लक्ष्मीबाई रामचंद्र गड्डद (वय 77) या फत्तेसिंह चौकातील गणेश पोतदार यांच्या के.पी. कॉम्प्युटर्स एसबीआय ग्राहक सेवा केंद्रात पेन्शन काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी सकाळी 11.24 वाजता रुपये १२,६०० पेन्शनची रक्कम काढून ती अर्ध्या तोळ्याच्या बोरमाळीसह पर्समध्ये ठेवली. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने त्या काही वेळ ग्राहक सेवा केंद्रात बसून राहिल्या. त्यानंतर रिक्षाने घरी गेल्यानंतर मुलाला पैसे देण्यासाठी पर्स उघडली असता रोख रक्कम आणि बोरमाळ चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घाबरलेल्या लक्ष्मीबाई गड्डद यांनी तातडीने ग्राहक सेवा केंद्रात जाऊन चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; मात्र ते स्पष्ट नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. तरीही अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने हार न मानता फत्तेसिंह चौकातील आयडीबीआय बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला. संशयास्पद हालचालींचा मागोवा घेत तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांची कसून चौकशी करून पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेली बोरमाळ आणि रुपये १२,६०० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्रमांक 0436/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासात डी.बी. पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल केदारनाथ सुतार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश अंगुले आणि पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत जवळगे यांच्या तपासकौशल्यामुळे हा गुन्हा अवघ्या एका दिवसात उघडकीस आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

ज्येष्ठ महिलेच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन अल्पावधीत आरोपीला अटक केल्याबद्दल श्रीमती लक्ष्मीबाई गड्डद यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, डी.बी. पथकाचे गणेश अंगुले, श्रीकांत जवळगे तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.



