सोलापूर महानगरपालिकेच्या १३० रिक्त पदांच्या भरतीस शासनाची मंजुरी…
सोलापूर महानगरपालिकेच्या १३० रिक्त पदांच्या भरतीस शासनाची मंजुरी…
सोलापूर, दि. ६ ऑगस्ट : सोलापूर महानगरपालिकेतील अत्यावश्यक नागरी सेवांना अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल करून नामनिर्देशनाच्या १३० रिक्त पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबतचा शासन आदेश निर्गमित केला आहे.

शासनाने यापूर्वी दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी एकदाच अपवादात्मक बाब म्हणून आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल केली होती. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विविध कारणांमुळे १३० पदे रिक्त राहिली होती. ही पदे भरता यावीत यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे विशेष परवानगीची मागणी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने आता उर्वरित १३० रिक्त पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे.
शासनाच्या मंजुरीनुसार कनिष्ठ अभियंता सहाय्यक, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक/लिपिक-टंकलेखक, फिल्टर इन्स्पेक्टर, फायर मोटार मेकॅनिक, फायरमन, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), मिडवाईफ, पाईप फिटर, पंप ऑपरेटर, सॅनिटरी इन्स्पेक्टर, लघुलेखक तसेच महिला व बाल विकास अधिकारी अशा विविध संवर्गांतील एकूण १३० पदे भरली जाणार आहेत.
या भरतीमुळे महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन, महिला व बाल विकास तसेच प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, नागरिकांना अधिक जलद, प्रभावी, दर्जेदार आणि वेळेवर नागरी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता ही भरती महापालिकेच्या सेवा वितरण क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
यासाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी टीसीएस आयओएन (TCS iON – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) किंवा आय.बी.पी.एस. (Institute of Banking Personnel Selection – IBPS) या शासनमान्य संस्थांपैकी कोणत्याही एका संस्थेची निवड करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडून संबंधित संस्थेची निवड, परीक्षा नियोजन, जाहिरात, अर्ज प्रक्रिया तसेच पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाही शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात येणार आहे.महापौर श्री. विनायक कोंड्याल म्हणाले,”सोलापूर महानगरपालिकेच्या १३० रिक्त पदांच्या भरतीस महाराष्ट्र शासनाने दिलेली मंजुरी ही सोलापूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बाब आहे.
या निर्णयामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन नागरिकांना अधिक कार्यक्षम, गतिमान आणि दर्जेदार सेवा देता येतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही भरती प्रक्रिया तातडीने, पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित राबविण्यात येईल. ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी शासनाने टीसीएस आयओएन किंवा आय.बी.पी.एस. या संस्थांपैकी एका संस्थेची निवड करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही त्वरित सुरू करण्यात येणार आहे. पात्र व गुणवंत उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देत संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण करण्यात येईल.”



