बळीराजाचे संकट दूर कर, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलचरणी साकडे
३१० तालुक्यांतील दुष्काळ दूर होऊन बळीराजाच्या जीवनात आनंदाचे दिवस येण्याची विठ्ठलचरणी प्रार्थना
बळीराजाचे संकट दूर कर, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलचरणी साकडे
३१० तालुक्यांतील दुष्काळ दूर होऊन बळीराजाच्या जीवनात आनंदाचे दिवस येण्याची विठ्ठलचरणी प्रार्थना
पंढरपूर (प्रतिनिधी):- राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजावरील संकटाचे ढग दूर व्हावेत, शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धीचे दिवस यावेत आणि सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात समाधान नांदावे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि विविध सवलती देण्याबरोबरच शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सपत्नीक भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे, मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे उपस्थित होत्या.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

• दुष्काळी संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी •
राज्यात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. दिवाळीच्या काळात शासनाकडून आर्थिक मदत तत्परतेने वितरित करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत लागू होणाऱ्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता शासन त्यांना तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल होत असून, संपूर्ण शहर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाले आहे. आषाढीप्रमाणेच कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन कमी वेळेत आणि सुलभतेने मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होत असून, सामान्य वारकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
• दर्शन मंडपासाठी २५ कोटींचा अतिरिक्त निधी •
आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पंढरपूर कॉरिडॉरचे काम करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

• मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान •
शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पासही या वारकरी दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.

यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’ चे प्रकाशन करण्यात आले. भक्तिभाव, वारकरी परंपरा आणि राज्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना अशा वातावरणात कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा उत्साहात पार पडली.



