राज्यातील ३,८३२ अंगणवाड्यांचा होणार कायापालट; स्मार्ट अंगणवाडी योजनेला शासनाची मंजुरी!
ई-लर्निंगपासून आधुनिक स्वयंपाकघरापर्यंत सुविधा; बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणाला मिळणार नवी दिशा
राज्यातील ३,८३२ अंगणवाड्यांचा होणार कायापालट; स्मार्ट अंगणवाडी योजनेला शासनाची मंजुरी!
ई-लर्निंगपासून आधुनिक स्वयंपाकघरापर्यंत सुविधा; बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणाला मिळणार नवी दिशा
मुंबई : प्रराज्यातील अंगणवाडी केंद्रांचे स्वरूप बदलून बालकांना आधुनिक, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण व पोषणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल ३ हजार ८३२ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो चिमुकल्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, स्मार्ट अंगणवाडी योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमधील शैक्षणिक वातावरण अधिक दर्जेदार करण्याबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. पारंपरिक अंगणवाडी केंद्रांना आधुनिक सुविधांनी सज्ज करून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
या योजनेंतर्गत निवड झालेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे लहान वयातील बालकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय स्वच्छ भारत किट, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन अशा सुविधाही उभारण्यात येणार आहेत.
अंगणवाडी इमारतींची रंगरंगोटी, आवश्यक किरकोळ दुरुस्ती, पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच आधुनिक स्वयंपाकघराची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमधील स्वच्छता, सुरक्षितता आणि एकूणच सुविधांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
• शासकीय जागेतील अंगणवाड्यांना प्राधान्य •
स्मार्ट अंगणवाडी योजनेसाठी निवड करताना संबंधित केंद्र शासकीय जागेत असणे आणि तेथे विद्युत जोडणी उपलब्ध असणे या महत्त्वाच्या बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत. या निकषांनुसार निवड झालेल्या ३ हजार ८३२ केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
• बालकांसह माता-भगिनींच्या सेवाही होणार सक्षम •
या उपक्रमाचा उद्देश केवळ अंगणवाडी इमारतींचे नूतनीकरण करणे एवढाच मर्यादित नसून बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवाही अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
एकूणच, स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील अंगणवाडी व्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळणार असून बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.



