एकनाथ शिंदेंचा वेगळाच अंदाज! बुलेटवरून पंढरीची पाहणी, स्वतः हातात पाइप घेऊन केले पाण्याचा फवारा
कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा; उपमुख्यमंत्र्यांचा थेट कृतीतून स्वच्छतेचा संदेश

एकनाथ शिंदेंचा वेगळाच अंदाज! बुलेटवरून पंढरीची पाहणी, स्वतः हातात पाइप घेऊन केले पाण्याचा फवारा
कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा; उपमुख्यमंत्र्यांचा थेट कृतीतून स्वच्छतेचा संदेश
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या तयारीची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनोख्या पद्धतीने पाहणी केली. बुलेटवरून शहरात फेरफटका मारत यात्रा व्यवस्थेचा आढावा घेणाऱ्या शिंदे यांनी केवळ पाहणीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता थेट हातात पाण्याचा पाइप घेत परिसरात पाण्याचा फवारणीही केली. उपमुख्यमंत्र्यांचा हा कृतीशील अंदाज उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि वारकरी दाखल होतात. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाकडून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात पाहणी दौरा केला.
• बुलेटवरून शहराची पाहणी; यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा •
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलेटवरून पंढरपूर शहरातील विविध भागांत फेरफटका मारत यात्रा व्यवस्थेची पाहणी केली. यात्रेच्या काळात होणारी भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि प्रमुख मार्गांवरील सुविधांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. पारंपरिक व्हीआयपी ताफ्यापेक्षा बुलेटवरून केलेल्या या पाहणीमुळे त्यांच्या दौऱ्याची विशेष चर्चा रंगली.

या दौऱ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हातात पाण्याचा पाइप घेऊन परिसरात पाण्याचि फवारा केला. उड्डाणपुलाखालील परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता व्यवस्थेच्या कामादरम्यान त्यांनी स्वतः पाण्याचा पाइप हातात घेत फवारणी केली. यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चवरे व इतर नेतेमंडळी बरोबरच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि उपस्थित अधिकरी सोबत होते. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रत्यक्ष कृतीत सहभाग घेतल्याने या प्रसंगाने उपस्थितांचे लक्ष वेधले.

केवळ अधिकाऱ्यांना सूचना देण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून कामात सहभाग घेण्याची त्यांची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली. यात्रेच्या काळात पंढरपूर शहर स्वच्छ आणि व्यवस्थित राहावे, हा या पाहणीमागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे या कृतीतून अधोरेखित झाले.

कार्तिकी यात्रेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, पार्किंग, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षितता या सुविधांना विशेष महत्त्व आहे. चंद्रभागा नदी परिसर तसेच श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत दाखल होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यात्रा शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.
बुलेटवरून पाहणी आणि स्वतः हातात पाइप घेऊन पाण्याची फवारणी, अशा दोन वेगळ्या कृतींमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा विशेष चर्चेत आला आहे. पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कामात सहभागी झाल्याचे हे छायाचित्र सध्या लक्षवेधी ठरत आहे.



