सोलापूर

जलयुक्त शिवारच्या उर्वरित 215 कामांना 31 ऑगस्टची मुदत; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना कडक निर्देश

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 साठी सोलापूरची पुन्हा निवड; निधी खर्च आणि प्रलंबित कामांवर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

जलयुक्त शिवारच्या उर्वरित 215 कामांना 31 ऑगस्टची मुदत; जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना कडक निर्देश

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 साठी सोलापूरची पुन्हा निवड; निधी खर्च आणि प्रलंबित कामांवर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

सोलापूर : जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित कामे कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कृषी, जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हरसुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण 3,572 कामांचा आराखडा मंजूर झाला असून त्यापैकी 2,853 कामे अभिसरणातून करण्यात येत आहेत. यातील 2,638 कामे पूर्ण झाली असून 215 कामे अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित विभागांनी या कामांचा वेग वाढवून निर्धारित मुदतीत ती पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना या कामांवर वैयक्तिक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. पुढील दोन दिवसांत तालुकास्तरीय समितीच्या बैठका घेऊन कृषी विभागाच्या 203 प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हा परिषदेकडील 71 कामांचा जलतारा योजनेत समावेश करून त्यांनाही मंजुरी देण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश त्यांनी दिले.

कामांची पारदर्शकता आणि ऑनलाइन नोंद सुनिश्चित करण्यासाठी सर्व विभागांनी जलयुक्त शिवार अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे जिओ-टॅगिंगचे छायाचित्रे आठ दिवसांच्या आत अपलोड करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत जिल्ह्यात चार प्रकल्पांची कामे सुरू असून आतापर्यंत 82.53 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून कामांच्या गतीत झालेल्या मंदीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकल्प क्रमांक 1, 2 आणि 3 मधील कामे तसेच निधी खर्चात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच पुढील आठ दिवसांत शंभर टक्के निधी खर्च करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. यावर्षी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.0 साठी पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याची निवड झाल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जलयुक्त शिवार अभियानासाठी 95.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या अभियानात मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वन विभाग आणि जलसंपदा विभाग सहभागी आहेत. या कामांमुळे 6,237.91 टीसीएम पाणीसाठा निर्माण होणार असून 2,405.83 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या चार प्रकल्पांसाठी 32.97 कोटी रुपयांची तरतूद असून त्यापैकी 82.53 टक्के निधी खर्च झाला आहे. जलतारा योजनेअंतर्गत 376 कामे मंजूर झाली असून 155 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृत सरोवर योजनेत मंगळवेढा तालुक्यात सात कामांना मंजुरी मिळाली आहे. वैयक्तिक लाभार्थी उत्पादन पद्धतीसाठी 3.23 कोटी रुपयांच्या निधीपैकी 91.83 टक्के खर्च पूर्ण झाला आहे.

गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली नऊ कामे सध्या पावसामुळे बंद असून पावसाळा संपल्यानंतर ती तातडीने पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी दिली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!