जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सीईओ कुशल जैन यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
दहावी-बारावीतील 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या 18 विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सीईओ कुशल जैन यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
दहावी-बारावीतील 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या 18 विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2026 मधील दहावी व बारावीच्या परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा बुधवारी (दि. 5) जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन (भा.प्र.से.) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना सीईओ कुशल जैन यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करत, “यश मिळविण्यासाठी सातत्याने अभ्यास करा. भविष्यात शिक्षणाच्या वाटचालीत कोणतीही अडचण आली, तर कोणत्याही वेळी माझ्याशी संपर्क साधा. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मी सदैव तयार आहे,” असे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पतसंस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सभासदांच्या पाल्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात दहावीतील 12 आणि बारावीतील 6 अशा एकूण 18 गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, पुस्तक आणि फाईल देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे मार्गदर्शक व्ही. डी. नवले, माजी तज्ज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, दयानंद परिचारक, चेअरमन श्रीमती शेतांबरी राऊत, श्रीधर कलशेट्टी, डॉ. एस. पी. माने, एस. आर. तांबोळी, एस. एन. कुंभार, विशाल घोगरे, चेतन वाघमारे, शिवानंद म्हमाने, किरण लालबोन्द्रे, विष्णू पाटील, सौ. एम. एस. शिंदे, रोहित घुले, व्ही. एम. घेरडे, शिवाजी राठोड, जी. एम. मारडकर, तजमूल मुतवल्ली, विकास शिंदे, तज्ज्ञ संचालक डॉ. पी. बी. नवले तसेच स्वीकृत संचालक के. एन. खुर्द आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन तजमूल मुतवल्ली यांनी केले. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



