आकांक्षित तालुक्यांतील 38 निर्देशांक वेळेत पूर्ण करा; सीईओ कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय आढावा; अक्कलकोट राज्यात तिसऱ्या, सांगोला प्रगतीपथावर

आकांक्षित तालुक्यांतील 38 निर्देशांक वेळेत पूर्ण करा; सीईओ कुशल जैन यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय आढावा; अक्कलकोट राज्यात तिसऱ्या, सांगोला प्रगतीपथावर
सोलापूर : निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तालुक्यांच्या विकासकामांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना 38 निर्देशांकांवरील उद्दिष्टे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अक्कलकोटचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम, सांगोल्याचे सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय विभागप्रमुख, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच तालुका फेलो उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाने आपल्या कामगिरीचे सादरीकरण केले. ज्या बाबी प्रलंबित आहेत त्या तातडीने पूर्ण करून शासनाने निश्चित केलेली उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यावर भर देण्याच्या सूचना सीईओ कुशल जैन यांनी दिल्या.
केंद्र शासनाने देशातील सर्वाधिक मागासलेल्या 513 तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील 27 तालुके या कार्यक्रमात समाविष्ट असून, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तीन तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
निती आयोगाच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अक्कलकोट तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी करत तिसरे स्थान मिळविले असून, सांगोला तालुकाही सातत्याने प्रगतीपथावर आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित निर्देशांकांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचा दर्जा उंचावण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत 38 महत्त्वाच्या निर्देशांकांच्या आधारे प्रत्येक तालुक्याचे नियमित मूल्यमापन केले जाते. यामध्ये आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून उद्दिष्टपूर्तीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
*अक्कलकोटची राज्यात तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी*
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि सांगोला या तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी अक्कलकोट तालुक्याने निती आयोगाच्या राज्यस्तरीय क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले असून, सांगोला तालुका देखील सातत्याने प्रगती करत आहे. उर्वरित निर्देशांकांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.



