क्राईम

आमदार कल्याणशेट्टींच्या जीवाला धोका? चालकाला हत्येसाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप

आमदार कल्याणशेट्टींच्या जीवाला धोका? चालकाला हत्येसाठी पैशांचे आमिष दाखवल्याचा आरोप

सोलापूर : अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशांचे आमिष दाखवून प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे चालक आनंद स्वामीराव सुरवसे (वय ३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास आमदारांच्या पत्नी व मुलाला घेऊन महावीर चौकातील प्युमा शोरूममध्ये गेले होते. आमदारांचे कुटुंबीय खरेदीसाठी शोरूममध्ये गेल्यानंतर चालक सुरवसे हे बाहेर थांबले होते.

याच वेळी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक इसम चालक सुरवसे यांच्या जवळ आला. त्याने कथितरित्या, “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदारला गोळी घालून मार, मी पुढचे बघून घेतो,” असे सांगितल्याचा आरोप आहे.

या व्यक्तीसोबत असलेल्या दुसऱ्या इसमानेही चालकाला उद्देशून “साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे,” असे सांगत आमदारांना जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी चॉकलेटी शर्ट घातलेला आणखी एक इसम आला. त्याने संबंधित दोघांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या चालक सुरवसे यांनी घडलेला प्रकार त्याच दिवशी सायंकाळी आमदारांचे पी.ए. आणि आमदारांच्या भावाला सांगितला.

यानंतर दुसऱ्या दिवशी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या फुटेजच्या आधारे चालकाला कथितरित्या आमदारांच्या हत्येसाठी प्रवृत्त करणारे इसम श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी असल्याचे समोर आल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

• BNSच्या कलमांनुसार गुन्हा दाखल •

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चालक आनंद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसांनी श्रीशैल हुळ्ळी आणि फुलारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३(५) व ५५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सदाशिव सावंत करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तक्रारीतील आरोप तसेच संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

• राजकीय वर्तुळात खळबळ •

विद्यमान आमदारांच्या हत्येसाठी त्यांच्या चालकाला कथितरित्या पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप असल्याने या घटनेने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कथित प्रकारामागे नेमका उद्देश काय होता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि चालकाला हत्येसाठी प्रवृत्त करण्यामागे कोणाचे आदेश होते का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!