सोलापूर

शिक्षणासोबत संस्कारांची शिदोरी महत्त्वाची; विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक गावडे यांचे आवाहन

सुतार गुरुजींच्या स्मरणार्थ कारंब्यात सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

शिक्षणासोबत संस्कारांची शिदोरी महत्त्वाची; विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक गावडे यांचे आवाहन

सुतार गुरुजींच्या स्मरणार्थ कारंब्यात सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सोलापूर : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या वर्तनात संस्कार आणि शिस्त जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात वावरताना आपल्या हातून असे कोणतेही कृत्य घडू नये, ज्यामुळे आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल. योग्य मार्गावर चालत आपले वर्तन संस्कारी ठेवून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन उत्तर सोलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी केले.

कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे कै. अभिमन्यू नारायण सुतार गुरुजी यांच्या स्मरणार्थ विश्वकर्मा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील सुमारे २५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विश्वकर्मा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या नूतन बसस्थानकाचे लोकार्पणही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे होते. यावेळी उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले, पंचायत समिती सदस्या सुनिता बारसकर, दक्षिण सोलापूर पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, विश्वकर्मा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात कुटुंबातील आपुलकी, जिव्हाळा आणि एकोपा कमी होत असल्याचे चित्र दिसून येते. कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता चांगले संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांनाही महत्त्व द्यावे. मुलांनी योग्य मार्ग निवडल्यास पालकांना कोणत्याही कारणासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दक्षिण सोलापूर पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक ठिकाणी आई-वडिलांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होताना दिसते. अशा परिस्थितीत कै. सुतार गुरुजींच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम समाजासमोर संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणारा आहे.

विश्वकर्मा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामस्थांच्या सोयीसाठी बसस्थानकाची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास उत्तर सोलापूर भाजप तालुकाध्यक्ष संभाजी दडे, अविनाश शिरसाट, नागेश ननवरे, राजाराम गरड, केदार विभुते, ग्रामपंचायत सदस्य कमल पाटील, लेबर फेडरेशनचे संचालक महादेव जाधव, विश्वनाथ जगताप, राजाभाऊ तंबाके, बापूसाहेब पाटील, अकबर पटेल, सुहास भोसले, संजय आदाटे, शहाजी गायकवाड, राहुल मस्के, मशाक शेख, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अमोल सुतार यांनी मानले.

• गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात •

कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सुमारे २५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागणार आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

• ग्रामस्थांसाठी नूतन बसस्थानकाची सुविधा •

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाबरोबरच विश्वकर्मा सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या नूतन बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या बसस्थानकामुळे कारंबा येथील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सामाजिक उपक्रमासोबतच सार्वजनिक सुविधेच्या निर्मितीसाठी फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!