सोलापूर

बबलादच्या जिल्हा परिषद शाळेत छताचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी, २ शिक्षक जखमी

सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती करूनही दुर्घटना; निकृष्ट कामाची चौकशी करून नवीन इमारत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

बबलादच्या जिल्हा परिषद शाळेत छताचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी, २ शिक्षक जखमी

सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती करूनही दुर्घटना; निकृष्ट कामाची चौकशी करून नवीन इमारत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी

अक्कलकोट : तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेत मंगळवारी सकाळी धक्कादायक दुर्घटना घडली. शाळेच्या व्हरांड्याच्या छताचा स्लॅब अचानक कोसळल्याने १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मंगळवारी (११ ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळेतील प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी रांगेने आपल्या वर्गाकडे जात होते. याचवेळी सुमारे २५ वर्षे जुन्या इमारतीतील व्हरांड्याच्या छताचा मोठा भाग अचानक कोसळला. छताचा भाग विद्यार्थ्यांच्या दिशेने कोसळल्याने काही विद्यार्थ्यांना डोक्याला व कपाळाला किरकोळ दुखापत झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे शाळेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दुर्घटनेत रमेश शिवमूर्ती आणि भीमण्णा गवळी हे दोन शिक्षकही जखमी झाले. घटना घडताच शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे, या शाळेच्या इमारतीची अवघ्या सहा महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती होऊन काही महिने उलटत नाहीत तोच छताचा भाग कोसळल्याने संबंधित कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पंचायत समितीचे  उपसभापती  सागर कल्याणशेट्टी यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेच्या संपूर्ण इमारतीची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधितांची चौकशी करावी, तसेच जीर्ण झालेल्या इमारतीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळेची इमारत उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

या घटनेनंतर शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली जाते, तसेच दुरुस्तीच्या कामाची चौकशी होते का, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!