सोलापूर

फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे संवेदनशील पत्रकार दडलेला असतो’ : इंद्रजित पवार

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान

‘फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे संवेदनशील पत्रकार दडलेला असतो’ : इंद्रजित पवार

जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान

‘छायाचित्रांमधून विकासाचा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो’ : महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर : एखाद्या व्यक्तीचे कार्य, एखाद्या घटनेचा इतिहास आणि समाजातील बदल जतन करण्याचे सामर्थ्य छायाचित्रामध्ये असते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या व्यक्तीचे कार्य आणि इतिहासही एखाद्या जुन्या छायाचित्रामुळे पुढील पिढ्यांसमोर जिवंत राहतो. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार दडलेला असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि एस. पी. सिक्युरिटी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या विचारमंचावर महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, वै. वा. ह.भ.प. धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आणि फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी छायाचित्राचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना आपल्या अनुभवाचे उदाहरण दिले. एका ऐतिहासिक पुतळ्याच्या उद्घाटनासंदर्भातील माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी जुन्या छायाचित्राचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले.

माणूस काळाच्या पडद्याआड गेला तरी त्याचे छायाचित्र त्याचे कार्य, व्यक्तिमत्त्व आणि इतिहास जिवंत ठेवते. त्यामुळे छायाचित्रकाराने टिपलेला प्रत्येक क्षण भविष्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो, असे पवार यांनी सांगितले.

पत्रकार समाजासमोर घटना मांडतो, तर छायाचित्रकार त्या घटनेचा महत्त्वाचा क्षण कॅमेऱ्यात कायमचा बंदिस्त करतो. त्यामुळे छायाचित्रकार हा पत्रकारितेचा अविभाज्य भाग असून, ‘फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार दडलेला असतो,’ असे इंद्रजित पवार यांनी स्पष्ट केले.

महापौर विनायक कोंड्याल यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे महत्त्व सांगताना आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव कथन केला.

२००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. त्या काळातील प्रभागाची जुनी छायाचित्रे छायाचित्रकारांनी टिपून ठेवली होती. २०१२ च्या निवडणुकीच्या वेळी ही जुनी छायाचित्रे नागरिकांना दाखवून विकासकामांपूर्वीची आणि नंतरची परिस्थिती समोर ठेवता आली. छायाचित्रांमधील हा बदल नागरिकांच्या स्मरणात ठसला आणि त्याचा दुसऱ्यांदा निवडून येताना आपल्याला फायदा झाला, असा अनुभव कोंड्याल यांनी सांगितला.

जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचे काम पत्रकारिता करते. त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून घटना, व्यक्ती आणि महत्त्वाचे क्षण कायमस्वरूपी जतन करतात. त्यामुळे पत्रकारितेसोबतच छायाचित्रकारांचे योगदानही अनन्यसाधारण आहे, असे महापौर कोंड्याल म्हणाले.

छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.

वै. वा. ह.भ.प. धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे यांनी छायाचित्रकाराच्या कार्याचे वर्णन ‘दृश्य, द्रष्टा आणि दर्शक’ या त्रिपुटीशी जोडले.

एआयच्या युगात मूळ छायाचित्र आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदललेले छायाचित्र यातील फरक ओळखणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे छायाचित्रकारांनी आपल्या कामात सत्यता, अचूकता आणि विश्वासार्हता जपणे आवश्यक आहे, असे सुरवसे यांनी सांगितले.

छायाचित्रकार एखादा क्षण टिपतो आणि पुढे तोच क्षण इतिहासाचा साक्षीदार बनतो. त्यामुळे छायाचित्रकाराचे काम केवळ छायाचित्र काढण्यापुरते मर्यादित नसून इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले, तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, नारायण सुरवसे, विक्रम खेलबुडे, सागर सुरवसे, किरण बनसोडे आणि संदीप वाडेकर यांच्या उपस्थितीत विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि माध्यम संस्थांमधील पत्रकार, छायाचित्रकार व कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!