सोलापूर

सोलापूर जिल्हा रुग्णालयासह संभाजी महाराज तलावाच्या कामांची चौकशी करा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची संभाजी ब्रिगेडची मागणी

अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना निवेदन; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबत २० मुद्द्यांवर गंभीर आरोप

सोलापूर जिल्हा रुग्णालयासह संभाजी महाराज तलावाच्या कामांची चौकशी करा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची संभाजी ब्रिगेडची मागणी

अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना निवेदन; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभाराबाबत २० मुद्द्यांवर गंभीर आरोप

सोलापूर : सोलापूर जिल्हा रुग्णालयातील कथित आर्थिक अनियमितता, विविध टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि आरोग्य विभागातील प्रशासकीय कारभारासह विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अंदाज मंडळ समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर सोलापूर दौऱ्यावर असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या कारभाराबाबत तसेच आरोग्य विभागातील विविध बाबींवर निवेदनात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणीही करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात तब्बल २० मुद्दे मांडण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील विविध टेंडर प्रक्रिया, आषाढी वारीसाठी औषध खरेदी, एअर अॅम्ब्युलन्स व्यवस्था, चष्मा खरेदी, जाहिरात बिलांशी संबंधित व्यवहार, कर्मचारी व्यवस्थापन आणि रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजाबाबत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसणे, माढा ग्रामीण रुग्णालयातील कथित गैरव्यवस्था, मंगळवेढा येथील रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेली नाराजी आणि तांदूळवाडी येथील दुर्घटनेनंतर मृतदेह हाताळणीबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता तसेच विविध शस्त्रक्रियांमध्ये झालेल्या कथित गंभीर त्रुटींची चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरले जात असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडने केला आहे. PCPNDT संदर्भातील कामकाज आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या कामांची स्वतंत्र चौकशी समितीमार्फत तपासणी करून दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याचाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अंदाज मंडळ समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी संबंधित प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे संभाजी ब्रिगेडने सांगितले.

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच मुंबई येथील संबंधित आयुक्तांकडे ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर, बंटी गायकवाड, प्रकाश व्यवहारे, हनुमंत पवार यांच्यासह ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!