सोलापूर

बबलाद शाळेचा गिलावा झोक्यामुळेच कोसळला? CEO कुशल जैन यांच्या दाव्याने चर्चेला उधाण

CEO कुशल जैन यांच्या स्पष्टीकरणाने नवा वाद; ग्रामस्थांचा दावा - 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगातून दुरुस्ती, वरच्या स्लॅबवर केवळ पीसीसीचे काम

बबलाद शाळेचा गिलावा झोक्यामुळेच कोसळला? CEO कुशल जैन यांच्या दाव्याने चर्चेला उधाण

CEO कुशल जैन यांच्या स्पष्टीकरणाने नवा वाद; ग्रामस्थांचा दावा – 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगातून दुरुस्ती, वरच्या स्लॅबवर केवळ पीसीसीचे काम

अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेतील सिलिंगचा गिलावा कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेचे नेमके कारण काय, यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिलेले स्पष्टीकरण या घटनेपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या म्हणण्यानुसार, शाळेतील सिलिंग फॅनच्या हुकाला साडीचा झोका बांधण्यात आला होता. या झोक्यामुळे सिलिंगवर भार पडून गिलावा कोसळल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणावर पालक आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिलिंग फॅनच्या हुकाला झोका बांधल्याने गिलावा कोसळत असेल, तर सिलिंगची बांधकाम गुणवत्ता किती मजबूत होती? गिलाव्याची पकड आधीपासूनच कमकुवत होती का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

बबलाद येथील ग्रामस्थांच्या माहितीनुसार, शाळेची इमारत साधारण 1995 ते 2000 या कालावधीत बांधण्यात आली आहे. म्हणजेच ही इमारत सुमारे 25 ते 30 वर्षे जुनी आहे.

जुन्या इमारतीची वेळोवेळी तपासणी, देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती झाली होती का? इमारतीच्या छताची आणि सिलिंगची मजबुती तपासण्यात आली होती का? याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.

या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब ग्रामस्थांनी पुढे आणली आहे. त्यांच्या माहितीनुसार, 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती.

या दुरुस्तीमध्ये इमारतीच्या वरच्या स्लॅबवर पीसीसीचे काम करण्यात आले होते. मात्र, या कामानंतर पावसाळ्यात छतावर पाणी साचत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

छतावर पाणी साचत असेल, तर त्याचा स्लॅबच्या मजबुतीवर किंवा त्याखालील सिलिंगवर परिणाम झाला होता का? पीसीसीचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने करण्यात आले होते का? पाण्याचा निचरा व्यवस्थित करण्याची व्यवस्था करण्यात आली होती का? या प्रश्नांची उत्तरे आता महत्त्वाची ठरत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या काही दिवस आधी म्हणजेच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शाळेच्या छताला रंगकाम करण्यात आले होते. त्यामुळे छत किंवा भिंतीला काही फुगवटा अथवा खराबी असल्यास ती रंगकामामुळे बाहेरून सहज लक्षात आली नसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, या सर्व बाबींची सत्यता तज्ज्ञ अभियंत्यांच्या तांत्रिक तपासणीतून स्पष्ट होणे गरजेचे आहे.

एका बाजूला प्रशासनाकडून झोक्याच्या भारामुळे गिलावा कोसळल्याचे कारण सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांकडून जुन्या इमारतीचे वय, 2022-23 मधील दुरुस्ती, वरच्या स्लॅबवर करण्यात आलेले पीसीसीचे काम आणि पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

त्यामुळे गिलावा कोसळण्याचे नेमके कारण तांत्रिक तपासणीशिवाय निश्चित करणे योग्य ठरेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

2022-23 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? संबंधित मक्तेदाराने कोणत्या पद्धतीने काम केले? पीसीसीच्या कामाची तांत्रिक तपासणी कोणी केली? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का?

जर दुरुस्तीच्या कामात कोणतीही त्रुटी आढळली, तर संबंधित मक्तेदारासह कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार का? हा प्रश्न पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, विद्यार्थ्यांची नियमित वर्दळ असलेल्या शाळेच्या वर्गात छताचा गिलावा कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आज गिलावा कोसळला; उद्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच छताचा भाग कोसळून जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेनंतर शाळेच्या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. स्लॅब, सिलिंग, भिंती, बीम, कॉलम तसेच 2022-23 मध्ये करण्यात आलेल्या पीसीसी कामाची तांत्रिक तपासणी करावी.

इमारतीचा कोणताही भाग धोकादायक आढळल्यास विद्यार्थ्यांना त्या भागात प्रवेश देऊ नये. आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.

‘झोका बांधल्यामुळे गिलावा कोसळला’ हे प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे. मात्र, शाळेची जुनी इमारत, 2022-23 मध्ये 15व्या वित्त आयोगातून झालेली दुरुस्ती, वरच्या स्लॅबवर करण्यात आलेले पीसीसीचे काम आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या सर्व बाबींचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने या घटनेचे खरे कारण निष्पक्ष तांत्रिक तपासणीद्वारे समोर आणावे. दोष आढळल्यास संबंधित मक्तेदार आणि नियंत्रण अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

बबलाद शाळेतील गिलावा नेमका झोक्यामुळे कोसळला की बांधकाम-दुरुस्तीतील त्रुटींमुळे, याचे उत्तर आता तांत्रिक चौकशीतूनच मिळणार आहे

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!