करमाळ्यात विकासकामांना गती देण्याचे CEO कुशल जैन यांचे निर्देश; घरकुलांपासून आरोग्य सुविधांपर्यंत घेतला आढावा

करमाळ्यात विकासकामांना गती देण्याचे CEO कुशल जैन यांचे निर्देश; घरकुलांपासून आरोग्य सुविधांपर्यंत घेतला आढावा
करमाळा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी करमाळा तालुक्याचा दौरा करत विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामसेवकांची बैठक घेण्याबरोबरच जलतारा प्रकल्प, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत जिम आणि आरोग्य केंद्राची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
करमाळा पंचायत समिती कार्यालयात झालेल्या ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय विकासकामे आणि विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेतील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशा स्पष्ट सूचना कुशल जैन यांनी ग्रामसेवकांना दिल्या. नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

यानंतर त्यांनी वीट येथील जलतारा प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पांतर्गत झालेल्या कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि पुढील नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जलसंधारण आणि ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता आणि नियोजन याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
वीट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत कुशल जैन यांनी वर्गखोल्या, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा आणि शौचालयांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे सांगत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षलागवड करण्यासोबतच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, ग्रामपंचायत वीट येथे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जिमचे उद्घाटन कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील युवक आणि नागरिकांना व्यायामाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळावी या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात आली आहे.
कुशल जैन यांनी ग्रामपंचायत देवीचा माळ येथेही भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न आणि बाबींची माहिती त्यांनी जाणून घेतली.
यानंतर कोर्टी येथील आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली. रुग्ण तपासणी कक्ष, औषध विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती विभाग, लसीकरण विभाग, रुग्ण नोंदणी व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्थेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली.
आरोग्य केंद्रात रुग्णांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, सर्व विभागांमध्ये स्वच्छता व शिस्त राखली जावी, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना कुशल जैन यांनी दिल्या.
या दौऱ्यात गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, सचिन जगताप यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते.



