PCPNDT कायद्यांतर्गत धडक कारवाई वाकी-शिवणे येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, सोनोग्राफी मशिन व मोबाईल जप्त

PCPNDT कायद्यांतर्गत धडक कारवाई
वाकी-शिवणे येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, सोनोग्राफी मशिन व मोबाईल जप्त
सांगोला (प्रतिनिधी) : गर्भलिंग निदान प्रतिबंधक PCPNDT कायदा, 1994 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सांगोला तालुक्यात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. वाकी-शिवणे येथे बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकून सोनोग्राफी मशिन, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका समुचित प्राधिकारी तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना दिनांक 5 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वाकी-शिवणे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राहणाऱ्या भास्कर रामचंद्र घाडगे यांच्या घरी पोलीस पथकासह अचानक भेट दिली असता, सुनिल संतोष शिंदे व पूजा सुनिल शिंदे रा. तळसंगी, ता. मंगळवेढा हे दाम्पत्य आढळले.

चौकशीत या ठिकाणी गर्भातील बाळ मुलगा आहे की मुलगी हे सांगून प्रत्येक तपासणीसाठी 15 हजार रुपये घेतले जात असल्याचे समोर आले. तपासणी दरम्यान USG Probe, OPPO मोबाईल, चार्जर व पॅकिंग केस असा साहित्य जप्त करण्यात आले. यासाठी कोणतेही वैध PCPNDT नोंदणी प्रमाणपत्र किंवा कायदेशीर कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
चौकशीत हे उपकरण प्रवीण पोपटराव देशमुख, रा. बारामती यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भास्कर रामचंद्र घाडगे, प्रवीण पोपटराव देशमुख व बापूराव किसवे या तिघांविरुद्ध PCPNDT कायदा व भा.द.वि. च्या संबंधित कलमानुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी डॉ. गिराम यांनी सांगितले की, अवैध गर्भलिंग निदान करणे हा अत्यंत गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारात सहभागी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. नागरिकांनी तालुक्यात कुठेही असे प्रकार सुरू असल्यास तात्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
माहितीसाठी टोल फ्री 18002334475 / 104 किंवा http://amchimulgimaha.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. खरी माहिती दिल्यास खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. असे तपास अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सांगोला डॉ. अरविंद सुभाषराव गिराम यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.



