मनोरंजन

चाहत्यांची वाढली होती चिंता… अखेर मिथुन चक्रवर्तींच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट

कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार पूर्ण; शुवेंदू अधिकारी यांनी भेट घेत प्रकृतीविषयी दिलासा देणारी माहिती दिली

चाहत्यांची वाढली होती चिंता… अखेर मिथुन चक्रवर्तींच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट

कोलकात्यातील खासगी रुग्णालयात उपचार पूर्ण; शुवेंदू अधिकारी यांनी भेट घेत प्रकृतीविषयी दिलासा देणारी माहिती दिली

कोलकाता : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते तसेच भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उजव्या हातावरील छोट्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना दोन दिवसांपूर्वी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या एका अपघातानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या उजव्या हातात धातूची प्लेट बसवण्यात आली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुवारी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेद्वारे ही प्लेट काढण्यात आली. ही नियमित स्वरूपाची आणि कमी वेळात पूर्ण होणारी शस्त्रक्रिया असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, “मिथुनदांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल,” अशी माहिती दिली. त्यांनी या भेटीचे छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केले.

शुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या आरोग्याविषयी फारशी माहिती सार्वजनिक केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक माहिती दिल्याने चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी भाजपच्या जाधवपूर मतदारसंघातील आमदार शर्वरी मुखर्जी या देखील रुग्णालयात उपस्थित होत्या. डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती समाधानकारक असून आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे ते लवकरच न्यू टाउन येथील आपल्या निवासस्थानी परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!