अक्कलकोटकरांनो, पाणी जपून वापरा! नवीन पाइपलाइनच्या कामामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद
नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन

अक्कलकोटकरांनो, पाणी जपून वापरा! नवीन पाइपलाइनच्या कामामुळे तीन दिवस पाणीपुरवठा बंद
नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन
अक्कलकोट : अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने कुर्नूर धरणातील इंटेक वेलपासून जॅकवेलपर्यंत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार असून, पुढील तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.

नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा यंत्रणेतील नियमित पाणीउपसा आणि वितरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद राहण्याची कालावधी लक्षात घेता नागरिकांनी घरातील उपलब्ध पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन गरजेपुरतेच पाणी वापरावे. तसेच पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे काही काळ पाणीपुरवठा बंद ठेवून करण्यात येणाऱ्या या कामासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहण्याची ही कालावधी नागरिकांसाठी गैरसोयीची असली तरी भविष्यातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले काम असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



