शिवरायांच्या प्रतिमेजवळ मोदींचा फोटो; अमित ठाकरे आक्रमक, कॉलेज प्रशासनाकडून फोटो हटवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीस किंवा समकक्ष कोणाचाही फोटो लावू नये’; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कॉलेजमध्ये गेलेल्या अमित ठाकरेंचा प्रशासनाला जाब

शिवरायांच्या प्रतिमेजवळ मोदींचा फोटो; अमित ठाकरे आक्रमक, कॉलेज प्रशासनाकडून फोटो हटवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीस किंवा समकक्ष कोणाचाही फोटो लावू नये’; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कॉलेजमध्ये गेलेल्या अमित ठाकरेंचा प्रशासनाला जाब
पुणे : विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि वसतिगृहातील अडचणी जाणून घेण्यासाठी कॉलेजला भेट देण्यासाठी गेलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एका मुद्द्यावरून कॉलेज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचे समोर आले आहे. वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर अमित ठाकरे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.
अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी तसेच वसतिगृहातील विविध समस्या समजून घेण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी वसतिगृह अधीक्षकांच्या कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयातील भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हा प्रकार पाहताच अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि प्रेरणेचे प्रतीक असून, त्यांच्या प्रतिमेच्या शेजारी त्यांच्या तोडीचा किंवा समकक्ष असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या पद्धतीने कोणाचाही फोटो लावू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी अमित ठाकरे यांनी कॉलेज प्रशासनाला या फोटोबाबत जाब विचारत तो तातडीने हटवण्याची भूमिका घेतली. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कॉलेज प्रशासनाने अधीक्षकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला.
अमित ठाकरे यांच्या या भूमिकेची चर्चा कॉलेज परिसरात सुरू झाली असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे आणि उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसोबतच महापुरुषांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरही मनसे विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याचे या घटनेतून दिसून आले.



