सोलापूर

१०७ वर्षांचा ‘पद्मशाली बिल्डिंग’चा वारसा आता नव्या वास्तुसंकुलात; ४२ वर्गखोल्यांचे अत्याधुनिक शिक्षणसंकुल उभारणार

शतकभराच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे पुनर्निर्माण; लोकसहभागातून साकारण्याचा पद्मशाली शिक्षण संस्थेचा संकल्प

१०७ वर्षांचा ‘पद्मशाली बिल्डिंग’चा वारसा आता नव्या वास्तुसंकुलात; ४२ वर्गखोल्यांचे अत्याधुनिक शिक्षणसंकुल उभारणार

शतकभराच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेल्या ऐतिहासिक वास्तूचे पुनर्निर्माण; लोकसहभागातून साकारण्याचा पद्मशाली शिक्षण संस्थेचा संकल्प

सोलापूर : सोलापूरच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय आणि सहकार चळवळींच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या साखर पेठेतील ऐतिहासिक ‘पद्मशाली बिल्डिंग’चे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. तब्बल १०७ वर्षांचा वारसा लाभलेल्या या वास्तूने अनेक पिढ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. आता या ऐतिहासिक वास्तूचे पुनरुज्जीवन करून अत्याधुनिक शिक्षणसंकुल उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
या नव्या वास्तुसंकुलाचे भूमिपूजन उद्योजक मा. श्री. राम रेड्डी, मॅनेजिंग डायरेक्टर, बालाजी अमाईन्स प्रा. लि., सोलापूर यांच्या शुभहस्ते आणि मा. श्री. विनायक रा. कोंड्याल, महापौर, सोलापूर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.

• १९१७ मध्ये उभी राहिली ‘वड्डेपल्ली बिल्डिंग’ •

पद्मशाली शिक्षण संस्थेची स्थापना सन १९१२ मध्ये झाली. संस्थेच्या कार्याचा प्रारंभ श्री मार्कंडेय मंदिरातून झाला. पुढील काळात वाढत्या शैक्षणिक कार्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता भासू लागल्याने साखर पेठेतील आशिकल मैदान परिसरातील सद्गुरू पट्टामी रामस्वामी ट्रस्टची सन १९०० मधील जागा निश्चित करण्यात आली.

ही जागा संस्थेचे अध्यक्ष विठोबा शिवय्या वड्डेपल्ली आणि सरचिटणीस हणमंतप्पा तुकाराम पल्ली यांच्या नावे बक्षीसपत्राने हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर संस्थेची स्वतःची वास्तू उभारण्याचा ठराव २५ मे १९१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

अध्यक्ष विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांनी पुढाकार घेत तब्बल १५ हजार रुपये स्वखर्चाने एकमजली इमारत उभारून ती संस्थेला अर्पण केली. या वास्तूचे उद्घाटन सन १९१७ मध्ये मुंबई प्रांताचे मंत्री तसेच सोलापूरचे विधिज्ञ रावबहादूर गणेश कृष्ण साठे यांच्या हस्ते झाले. ही वास्तू पुढे ‘वड्डेपल्ली बिल्डिंग’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

• सारंगी कुटुंबीयांचेही वास्तू उभारणीत योगदान •

वड्डेपल्ली बिल्डिंगच्या दक्षिण बाजूच्या जागेत प्रसिद्ध सूत व्यापारी सिद्रामप्पा चिन्नप्पा सारंगी यांनी आपले वडील चिन्नप्पा यल्लप्पा सारंगी यांच्या स्मरणार्थ एकमजली इमारत बांधून दिली.

या इमारतीची वास्तुशांती व उद्घाटन १७ नोव्हेंबर १९४० रोजी सोलापूरचे नगराध्यक्ष व्ही. बी. उपाख्य विसुभाऊ साठे यांच्या हस्ते, तर माजी नगराध्यक्ष मडिवाळप्पा काडादी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. वड्डेपल्ली आणि सारंगी या दोन्ही इमारतींचे १९४१ मध्ये संस्थेकडे हस्तांतरण झाले आणि त्यानंतर या संयुक्त वास्तूला ‘पद्मशाली बिल्डिंग’ असे नाव देण्यात आले.

नक्षीदार प्रवेशद्वार, प्रांगणातील गॉथिक शैलीतील कारंजे आणि वैशिष्ट्यपूर्ण फर्निचर यामुळे पद्मशाली बिल्डिंगला ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय महत्त्व प्राप्त झाले. या वास्तूमध्ये अनेक शैक्षणिक आणि समाजप्रबोधनाच्या उपक्रमांना सुरुवात झाली.

सन १९१७ मध्ये प्रौढ साक्षरता वर्ग, १९१८ मध्ये तेलुगू शाळा, १९२९ मध्ये वाचनालय व बौद्धिक व्याख्यानमाला, १९३३ मध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपक्रम आणि १९३९ मध्ये पुस्तकपेढी सुरू करण्यात आली.

यानंतर ही वास्तू सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय, सहकार आणि कामगार चळवळींचेही महत्त्वाचे केंद्र बनली. अखिल भारतीय पद्मशाली महासभेच्या बैठका (१९४१), पद्मशाली सांस्कृतिक मंडळ (१९७२), पद्मशाली महिला मंडळ (१९७३), पद्मशाली युवक संघटना (१९७५) आणि पूर्व विभाग वाचनालय (१९७५) अशा विविध संस्थांच्या कार्याचा प्रारंभ याच वास्तूतून झाला.

पद्मशाली बिल्डिंगचा पुढील काळात विस्तार करण्यात आला. पुढील प्रांगणाच्या पश्चिम बाजूस हॉल आणि वर्गखोल्यांची दुमजली इमारत उभारण्यात आली. १९६९ मध्ये आग्नेय दिशेला भूदेवीबाई कटकम बालक मंदिराची चार वर्गखोल्यांची दुमजली इमारत बांधण्यात आली.

त्यानंतर १९८० मध्ये पूर्व बाजूस यशवंत यंत्रमाग विणकर सहकारी सूत गिरणीच्या सभासदांच्या आर्थिक सहकार्याने नऊ वर्गखोल्यांची तीन मजली ‘यशसूत ग्रंथालय’ वास्तू उभारण्यात आली.

पद्मशाली बिल्डिंगने केवळ शैक्षणिक उपक्रमांनाच नव्हे, तर अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रारंभालाही आधार दिला. यामध्ये कुचन हायस्कूल (१९४३), नारायणराव कुचन प्राथमिक शाळा (१९६४), डी. आर. श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल (१९७४), कुचन प्रशाला कन्या विभाग वर्ग (१९८५), रामकृष्णपंत बेत रात्र प्रशाला व सायं कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग (१९८८), सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग (१९९०) आणि जे. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग यांचा समावेश आहे.

सध्या पद्मशाली बिल्डिंगमध्ये नारायणराव कुचन प्राथमिक शाळा आणि भूदेवीबाई कटकम बालक मंदिरातील हजाराहून अधिक बालक-विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र जुनी इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या अहवालाच्या आधारे विद्यमान इमारत उतरवून त्याठिकाणी नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
नियोजित नवीन शिक्षणसंकुलामध्ये ४२ वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, जिने तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या नियोजनानुसार चार मजली इमारत उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

• दातृत्वाची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन •

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून विविध दात्यांनी दिलेल्या भरीव आर्थिक योगदानातून संस्थेच्या शाळा-प्रशालांच्या वास्तू उभ्या राहिल्या आहेत. मागील तीन दशकांमध्ये उभारण्यात आलेल्या ओ. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय (२०१४), जनाबाई ज. बिटला प्रशाला (२०१४), रामदास न. इप्पाकायल प्राथमिक शाळा व बालक मंदिर (२०१६), राजमल ना. बोमड्याल प्राथमिक शाळा व बालक मंदिर (२०२४), मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल (२०२४) आणि डी. आर. श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलची विस्तारित इमारत (२०२४) यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणगीदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल संस्था त्यांची चिरकाल ऋणी असल्याचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ ना. गोप यांनी सांगितले.

यावेळी श्रीनिवास क्यातम, मल्लिकार्जुन सरगम, गोवर्धन कमटम, श्रीनिवास कोंडी, दशरथ गोप, विजयकुमार गुल्लापल्ली, अशोक चिलका, पांडुरंग दिखी, दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्याल, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, सौ. संगीता इंदापुरे, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, श्रीनिवास जोग, रमेश बोटूल, गणेश गुञ्जा, हरिष कोंडा, नारायणराव कुचन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पुलकेशी संगा, व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

आता ऐतिहासिक पद्मशाली बिल्डिंगच्या नव्या वास्तूची उभारणीही लोकसहभाग आणि दातृत्वाच्या माध्यमातून करण्याचा संस्थेचा मानस आहे. शतकाहून अधिक काळाच्या शैक्षणिक व सामाजिक वारशाला आधुनिक रूप देणाऱ्या या प्रकल्पासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

दशरथ ना. गोप
सचिव, पद्मशाली शिक्षण संस्था, सोलापूर

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!