महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात सोलापुरात भीमसैनिकांचा विराट एल्गार; ‘संविधान वाचवा’च्या घोषणांनी शहर दणाणले

आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा मोर्चा; उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात सोलापुरात भीमसैनिकांचा विराट एल्गार; ‘संविधान वाचवा’च्या घोषणांनी शहर दणाणले

आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा मोर्चा; उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा

सोलापूर : अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सोमवारी सोलापुरात हजारो भीमसैनिकांनी विराट मोर्चा काढून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात राज्याच्या विविध भागांतील आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “आरक्षण वाचवा, संविधान वाचवा”, “जय भीम” आणि “उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.

या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, रुक्मिणी लोंढे यांच्यासह अनेक राज्यस्तरीय नेत्यांनी सहभाग घेतला.

सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर उद्यान ते जिल्हा परिषद पूनम गेट या मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. निळ्या झेंड्यांचा महासागर, संविधान बचावाचे संदेश देणारे फलक आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर निळामय झाला होता.

मोर्चात सोलापूर शहरासह मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, मंगळवेढा आणि माढा तालुक्यांतील हजारो नागरिक सहभागी झाले. अडीच ते तीन तास चाललेल्या या मोर्चामुळे शहरात सर्वत्र आंदोलनाचीच चर्चा होती.

जिल्हा परिषद पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. सभेत कृती समितीच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर कठोर टीका करत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर आघात असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाच्या अभिप्रायाचा चुकीचा अर्थ लावून सरकार राजकीय हेतूने हा निर्णय पुढे नेत असल्याचाही दावा करण्यात आला.

यावेळी समितीने न्यायमूर्तींचा अहवाल व सांख्यिकीय माहिती तातडीने जाहीर करावी, अनुसूचित जाती-जमाती उपयोजना निधीच्या संरक्षणासाठी स्वतंत्र वैधानिक कायदा करावा, एससी-एसटी समाजाच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे परत कराव्यात तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील अनुदानात वाढ करून अटी शिथिल कराव्यात, अशा विविध मागण्या शासनाकडे केल्या.

मोर्चादरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी वाहनातून उपस्थितांना अभिवादन केले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, जनार्दन शिंदे, अशोक जानराव, अॅड. संजीव सदाफुले, देवा उघडे, बबलू गायकवाड, राजा सोनकांबळे, अमित कांबळे, अतिश बनसोडे, श्याम क्षीरसागर, विनोद इंगळे, प्रयोजन कांबळे, कुमार चन्ना, सुहास सावंत यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेच्या शेवटी कृती समितीच्या वतीने शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला. अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!